पंढरपूरच्या वारीतील ते हरिण जळगावातील
By Admin | Updated: July 3, 2017 17:25 IST2017-07-03T17:25:24+5:302017-07-03T17:25:24+5:30
धानवड तांडा येथील चव्हाण कुटुंबियांनी केले दीड वर्ष संगोपन

पंढरपूरच्या वारीतील ते हरिण जळगावातील
>विलास बारी / ऑनलाईन लोकमत विशेष
जळगाव, दि.3 - आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणा:या वारक:यांसोबत चालणारे हरिण हे जळगाव तालुक्यातील धानवड तांडा येथील असल्याची माहिती समोर येत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर हरिणाच्या पिल्लाचा तब्बल दीड वर्ष सांभाळ केल्याचा दावा प्रेमराज चव्हाण यांनी केला आहे.
जळगाव तालुक्यात धानवड तांडा हे गाव आहे. साधारण दीड वर्षापूर्वी प्रेमराज चव्हाण यांचा पुतण्या रामेश्वर हा गुरे चारण्यासाठी शिरसोलीच्या जंगलात गेला होता. या दरम्यान त्याला दोन ते तीन दिवसांचे जखमी अवस्थेतील हरिणाचे पिल्लू दिसले. त्याने हे पिल्लू घरी आणले. गुरांच्या डॉक्टरांनी या पिल्लावर उपचार करीत त्याला जीवनदान दिले होते.
मुलाप्रमाणे केले हरिणाचे संगोपन
अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या या पिल्लाचे चव्हाण कुटुंबियांनी नवजात मुलाप्रमाणे संगोपन केले. सकाळी म्हशीचे दुध काढून झाल्यानंतर रामेश्वर बाटलीच्या साहाय्याने पिलाला दूध भरवित होता. काही दिवसात हे पिल्लू गल्लीत आणि परिसरात फिरायला लागले. दिवसभर जंगलात जावून संध्याकाळी हे चव्हाण कुटुंबियांकडे येत होते. धानवड सोबतच चिंचोली व परिसरातील गावांमध्ये या हरिणाचा मुक्त संचार होता.
महिनाभरापासून झाले हरिण बेपत्ता
साधारणपणे महिनाभरापूर्वी हे हरिण जंगलात गेले, त्यानंतर मात्र ते परत आले नाही. प्रेमराज चव्हाण, त्यांचे बंधू युवराज, पुतण्या रामेश्वर यांनी धानवड, चिंचोली, पळासखेडा, जामनेर, वाडी किल्ला या भागात या हरिणाचा शोध घेतला. मात्र ते मिळून न आल्याने चव्हाण कुटुंबिय निराश झाले. गेल्या आठवडय़ात वाडी किल्ला परिसरातील एका परिचित व्यक्तीने हरिण पंढरपूरच्या वारीसोबत फिरत असल्याचे चव्हाण यांना मोबाईलवर कळविले.
हरिणाच्या डाव्या पायाला जखम
वारक:यांसोबत असलेले ते हरिण आपण सांभाळ केलेले पिल्लू असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. या हरिणाच्या डाव्या पायाला जखमेचे व्रण असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सलग दीड वर्ष या हरिणाचा गावात मुक्त संचार असल्यान स्त्री किंवा पुरुषाबद्दल त्याच्या मनातील भीती नसल्याचे त्यांनी सांगितले.
जखमी अवस्थेतील या हरिणाचा मुलाप्रमाणे आम्ही सांभाळ केला आहे. दीड वर्षात हे पिल्लू दिवसभर कोठेही गेले तरी पहाटे चार वाजेच्या सुमारास दूध पिण्यासाठी घरी नित्यनियमाने येत होते. मात्र काही दिवसांपासून हरिणाचे पिल्लू परत न आल्याने आम्ही जळगाव व जामनेर तालुक्यात शोध घेतला. वारक:यांसोबत फिरणारे हरिण हे आमचेच आहे. त्याला परत दिल्यास पुन्हा संगोपन करू.
प्रेमराज चव्हाण, शेतकरी, धानवड तांडा, जळगाव.