दुकानांच्या तळघरांमध्ये साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:32+5:302021-09-09T04:22:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी जिल्हा परिषदकडे जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात ...

दुकानांच्या तळघरांमध्ये साचले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी जिल्हा परिषदकडे जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे जवळील दुकानांमध्ये पाण्याचा पाझर सुरू झाल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. दोन ते तीन दुकानांमधील तळघरांमध्ये गुडघ्याएवढे पाणी साचून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
शनिवारी रात्री धुवाॅंधार पाऊस झाला होता़ दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी दुपारी पुन्हा जोरदार पावसाने बॅटिंग केली. त्यामुळे शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात प्रचंड पाणी साचले. त्यामुळे टॉवर चौकाकडून जिल्हा परिषदकडे जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रस्त्याला असलेल्या दोन ते तीन दुकानांमधील तळघरांमध्ये त्या खड्ड्यातील पाण्यामुळे पाझर सुरू झाला. यामुळे गुडघ्यापर्यंत पाणी तळघरात साचले. एका दुकानातील दोन ते तीन कॉम्प्युटर, लॅपटॉप तसेच इन्व्हर्टर, पडदे, गादी व कपडे आदी पाण्यात भिजल्याने एक ते दोन लाखांचे नुकसान झाले होते. दरम्यान, शनिवारीसुध्दा असाच प्रकार घडल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
गेल्या तीस वर्षांत असे कधीही झाले नाही. उड्डाणपुलासाठी केलेल्या खड्ड्यामध्ये पाऊस झाल्यानंतर प्रचंड पाणी साचते. नंतर हे पाणी दुकानातील तळमजल्यात शिरत आहे. मात्र, त्याचा स्रोत कुठून आहे, हे कळले नाही. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
- बलजितसिंग छाबडा, व्यावसायिक