‘कुलसचिव हटाव’साठी कर्मचाऱ्यांचा तीन तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:38+5:302021-07-27T04:18:38+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व ...

The staff waits three hours for the ‘Registrar Removal’ | ‘कुलसचिव हटाव’साठी कर्मचाऱ्यांचा तीन तास ठिय्या

‘कुलसचिव हटाव’साठी कर्मचाऱ्यांचा तीन तास ठिय्या

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना कृती गट समितीच्यावतीने प्रभारी कुलगुरूंच्या दालनासमोर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनात विद्यापीठातील शेकडो अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग होता. दरम्यान, राजीनाम्यासंदर्भात एक ते दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन समितीला देण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे सचिव भैय्यासाहेब पाटील यांनी दिली.

प्रभारी कुलसचिव एस. आर. भादलीकर यांनी शिक्षकतेर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता शिक्षण संचालक कार्यालयात पाठविली होती, असा आरोप करीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना कृती गट समितीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आठ दिवसात राजीनामा नाही घेतला तर आंदोलन करण्‍यात येईल, असाही इशारा कृती समितीने दिला होता. त्यानंतर गुरुवारी कृती समितीने नाशिक गाठत प्रभारी कुलगुरू यांची भेट घेतली होती. त्यानंतर कुलगुरूंनी राजीनामा घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, पुढील कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे सोमवार, २६ रोजी कृती समितीतर्फे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर द्वारसभा घेण्यात आली.

जोरदार घोषणाबाजी

द्वारसभा पार पडल्यानंतर कृती समितीच्यावतीने थेट प्रभारी कुलगुरू ई. वायुनंदन यांच्या दालनाबाहेर दुपारी २ वाजता ठिय्या आंदोलन करण्‍यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. यावेळी कृती समितीचा विजय असो, कुलसचिव यांना हटवा अशी जोरदार घोषणबाजी कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. ठिय्या आंदोलन विद्यापीठातील शेकडो कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश होता. नंतर कुलगुरू व प्र-कुलगुरू यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दालनात बोलवून घेऊन मागणी ऐकून घेतली. नंतर एक ते दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन समितीला देण्यात आले. हे आंदोलन समितीचे अध्‍यक्ष शरद पाटील, सचिव भैय्यासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, महेश पाटील, दुर्योधन साळुंखे यांच्या नेतृत्‍वाखाली करण्यात आले.

Web Title: The staff waits three hours for the ‘Registrar Removal’