एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:33+5:302021-09-22T04:20:33+5:30
सचिन देव जळगाव : अनलॉकनंतर महामंडळातर्फे राज्यातील सर्व मार्गांवर बससेवा सुरू झाली असून, परराज्यातील मार्गांवरही बससेवा सुरू झाली आहे. ...

एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट!
सचिन देव
जळगाव : अनलॉकनंतर महामंडळातर्फे राज्यातील सर्व मार्गांवर बससेवा सुरू झाली असून, परराज्यातील मार्गांवरही बससेवा सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय टळली आहे. अंकलेश्वर, सेल्वासा, या मार्गावर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे जळगाव आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कोरोनामुळे शासनाने सर्वत्र काही महिने लॉकडाऊन केल्यामुळे महामंडळातर्फेही अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सामान्य प्रवाशासांठी बससेवा बंद होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, शासनाने पुन्हा अनलॉक केल्यामुळे, महामंडळातर्फेही राज्यासह परराज्यातही बससेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून प्रवाशांचा प्रतिसाद असलेल्या ठिकाणी बसेस सोडण्यात येत आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी परराज्यात जाणाऱ्या बसेसला ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे, अनेक प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत. जळगाव आगारातर्फे सुरत, अंकलेश्वर, वापी, सेल्वासा, बडोदा या मार्गावर बसेस सोडण्यात येत आहे. सध्या अंकलेश्वर, सेल्वासा, सुरत या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
परराज्यात जाणाऱ्या बसेस
जळगाव - अंकलेश्वर
जळगाव-वापी
जळगाव-सुरत
जळगाव-सेल्वासा
जळगाव-बडोदा
इन्फो :
अंकलेश्वर, सेल्वासा मार्गावर गाड्या फुल
जळगाव आगार प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव आगारातून दररोज परराज्यात ठरलेल्या गावांना वेळापत्रकानुसार बसेस जात आहेत. सकाळी आगारातून या बसेस निघत असून, रात्रभर मुक्कामी थांबून पुन्हा सकाळी जळगावकडे रवाना होत आहेत. सध्या अंकलेश्वर, सेल्वासा मार्गावर गाड्या फुल धावत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
८० टक्के वाहक-चालकांचे लसीकरण पूर्ण
जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगार प्रशासनातर्फे लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या आगारातील ८० टक्के चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले. तसेच इतर राहिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच लसीकरण शिबिर घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
इन्फो :
जळगाव आगारातून इतर राज्यात बस घेऊन जाणाऱ्या चालकांना लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या चालक-वाहकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. अशा कर्मचाऱ्यांना परराज्यात पाठवित आहोत. सध्या अंकलेश्वर, सेल्वासा या मार्गावर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नीलेश पाटील, व्यवस्थापक, जळगाव आगार