एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST2021-07-23T04:11:53+5:302021-07-23T04:11:53+5:30

सचिन देव जळगाव : खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा एस.टी.चा प्रवास सुरक्षित असला तरी, खासगी ट्रॅव्हल्समध्ये जी सुविधा व स्वच्छता असते, ती ...

ST travel safe; So why travels? | एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का?

एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का?

सचिन देव

जळगाव : खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा एस.टी.चा प्रवास सुरक्षित असला तरी, खासगी ट्रॅव्हल्समध्ये जी सुविधा व स्वच्छता असते, ती बसमध्ये राहत नाही. त्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी बसपेक्षा खासगी ट्रॅव्हल्सचा प्रवास सोयीस्कर असल्याचे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. तसेच बसप्रमाणे खासगी ट्रॅव्हल्सचा प्रवासही सुरक्षितच असल्याचे सांगण्यात आले.

पूर्वी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटी महामंडळातर्फेच बस सुविधा उपलब्ध असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत विविध खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फेही सुविधा पुरविणे सुरू झाले आहे. महामंडळाच्या बसेसच्या तुलनेत खासगी बसेसमध्ये विशेष आरामदायी सुविधा, वायफाय, टीव्ही संच आणि विशेष म्हणजे परिपूर्ण स्वच्छता असल्यामुळे या बसेस महामंडळाच्या बसेसपेक्षा सरस ठरत आहेत. तसेच खासगी बसेसला रस्त्यात कुठेही थांबविता येत असल्यामुळे, अनेक प्रवासी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत. सरकारी बसमध्ये खासगी बसपेक्षा सुविधा कमी असतात आणि अस्वच्छताही मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे महामंडळाच्या बसमधून प्रवास करायला कंटाळा येतो. त्यामुळे महामंडळाच्या बसपेक्षा खासगी ट्रॅव्हल्सला तिकीट जास्त असले तरी ट्रॅव्हल्समधील उपलब्ध सुविधांमुळेच ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला पसंती देत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

इन्फो :

बसपेक्षा खासगी ट्रॅव्हल्सला तिकीट जास्त असते आणि प्रवासही सुरक्षित असतो. हे खरे आहे. मात्र, एसटी बसमध्ये वायफाय, टीव्ही संच नसल्यामुळे प्रवास करताना कंटाळा येतो. मात्र, खासगी बसमध्ये या सर्व सुविधा असल्यामुळे मी बाहेरगावी जाताना, ट्रॅव्हल्समधूनच प्रवास करतो.

योगेश पाटील, प्रवासी

अपघाताच्या घटना काही दररोज होत नाहीत आणि आता बसपेक्षा खासगी ट्रॅव्हल्स अधिक सुरक्षित चालत असतात. तसेच सरकारी बसमध्ये स्वच्छता तर अजिबात नसते. सर्व खिडक्या या खराब झालेल्या असतात. त्या मानाने खासगी ट्रॅव्हल्समध्ये आसने चांगली आणि स्वच्छताही असते. म्हणून जास्त भाडे असले तरी खासगी ट्रॅव्हल्सचा प्रवास आनंददायी वाटतो.

सुनील वाणी, प्रवासी

इन्फो :

एसटीप्रमाणे खासगी ट्रॅव्हल्सलाही स्पीड लॉक

महामंडळातर्फे प्रत्येक बसला अपघाताच्या घटना टाळण्यासाठी खबरदारी म्हणून प्रत्येक बसला स्पीड लॉक करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसला ५० पर्यंत स्पीड लॉक करण्यात आला आहे, तर शहरी भागात धावणाऱ्या बसेसला ७० पर्यंत स्पीड लॉक करण्यात आला. केलेल्या स्पीड लाॅकपर्यंतच या बसेस ताशी धावत असतात. मात्र, खासगी ट्रॅव्हल्सलाही आरटीओ विभागाने ८० पर्यंत स्पीड लॉक केले आहे. त्या स्पीडनेच सर्व खबरदारी घेऊन खासगी ट्रॅव्हल्स धावत असल्याचे जळगाव ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश बेदमुथा यांनी सांगितले.

इन्फो :

एसटीचा प्रवास खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत खूप सुरक्षितच असतो. तसेच खासगी ट्रॅव्हल्ससारख्या आमच्याकडेही शिवशाहीसारख्या दर्जेदार बसेस आहेत. तसेच प्रवाशांची सुरक्षेची जबाबदारी महामंडळाची असते आणि काही प्र‌वासात काहीही दुखापत झाली तरी महामंडळ भरपाईदेखील देते. प्रवाशांचा कल खासगी बसेसला असला तरी ती त्यांची पसंती आहे. आमच्याकडील शिवशाही बसेसलाही सर्व सुविधा असून, सुरक्षितताही आहे.

नीलेश पाटील, व्यवस्थापक, जळगाव आगार

Web Title: ST travel safe; So why travels?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.