महामंडळाच्या आदेशानंतरच परराज्यात एसटीची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:12 IST2021-06-17T04:12:39+5:302021-06-17T04:12:39+5:30
कोरोनामुळे संपूर्ण मे महिन्यात कडक लॉकडाऊन असल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच ...

महामंडळाच्या आदेशानंतरच परराज्यात एसटीची सेवा
कोरोनामुळे संपूर्ण मे महिन्यात कडक लॉकडाऊन असल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना बसेस सोडण्यात येत होत्या. कोरोनामुळे महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे, एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात आर्थिक नुकसान झाले. मात्र, गेल्या आठवड्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर शासनाने ७ जूनपासून लॉकडाऊनमधील शिथिलता पूर्णतः शिथिल केली आहे. यामुळे महामंडळाच्या जळगाव आगारातर्फे पुन्हा सर्व मार्गावर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
मात्र, सुरत, अहमदाबाद, सिल्वासा, नवसारी, बडोदा, इंदूर या परराज्यांतील मार्गावर अद्यापही बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. जळगाव आगारातून सूरत, अहमदाबाद, इंदूर या मार्गावर बसने जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने, गेल्या अनेक वर्षांपासून महामंडळाची बससेवा सुरू आहे. मात्र, आता कोरोनामुळे ही बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महामंडळाने पुन्हा मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
इन्फो :
पुढील आठवड्यापासून शिवशाहीची सेवा
सध्या परराज्यातील सेवेबरोबरच मुंबई व पुणे मार्गावरची शिवशाही सेवाही बंद आहे. वातानुकूलीत असलेली ही शिवशाही बस बंद असल्यामुळे मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, याबाबत विभाग नियंत्रकांनी पुणे व मुंबईत कोरोना संसर्गाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शिवशाही सेवा बंद ठेवली आहे. मात्र, पुढील आठवड्यापासून या मार्गावर शिवशाहीची सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक जगनोर यांनी दिली.