क्रीडा दिनी क्रीडा शिक्षकांचा सत्कार! विकल्पची क्रीडा दिनाची संकल्पना खरोखरच अनोखी - गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:47+5:302021-09-02T04:36:47+5:30
धरणगाव : येथील विकल्प ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माजी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा सन्मान सोहळा जिल्ह्याचे ...

क्रीडा दिनी क्रीडा शिक्षकांचा सत्कार! विकल्पची क्रीडा दिनाची संकल्पना खरोखरच अनोखी - गुलाबराव पाटील
धरणगाव : येथील विकल्प ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माजी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा सन्मान सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यामध्ये १९८० ते २००० या कालावधीत धरणगावचे विद्यापीठ, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी खेळाडूंना व आजी-माजी क्रीडा शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विकल्प युथ अँड रुरल डेव्हलपमेंट रिसर्च मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील एकेकाळी नावलौकिक असलेले माजी खेळाडू व क्रीडा शिक्षकांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सदिच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सामाजिक समरसता मंचचे सदस्य प्रा. आर. एन. महाजन होते. त्यांनी कार्यक्रमाची भरभरून स्तुती केली. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, भाजपा गटनेते कैलास माळी, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, महाराष्ट्र राज्य क्रीडा महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डी. जी. पाटील तसेच हॉकीचे महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक अरविंद खांडेकर हे देखील उपस्थित होते. यावेळी आलेल्या अतिथी मान्यवरांचा विकल्प ऑर्गनायझेशन धरणगावच्यावतीने सत्कार करण्यात आला. कै. पी. के. जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या अश्विनीताई जोशी यांनी विकल्प ऑर्गनायझेशन या संस्थेला दरवर्षी २१०० रुपये आर्थिक योगदान देण्याची घोषणा केली. या वर्षाचा निधी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र मराठे यांच्याकडे सुपुर्द केला. सर्व माजी खेळाडूंच्यावतीने मीना सिसोदिया व अश्विनी जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला धरणगाव तालुक्यातील अनेक क्रीडा शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय प्रा. रवींद्र मराठे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लक्ष्मण पाटील यांनी केले.
010921\img_20210830_141557.jpg
फोटो कॅप्शन: मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना ना. गुलाबराव पाटील, प्रा. आर. एन. महाजन व मान्यवर.