मतविभाजनाचा फटका
By Admin | Updated: October 20, 2014 10:06 IST2014-10-20T10:06:21+5:302014-10-20T10:06:21+5:30
एरंडोल विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या पंचरंगी लढतीतील मतविभाजनाचा फटका शिवसेनेला बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ झाल्यामुळे डॉ.सतीश भास्करराव पाटील यांचा विजय झाला.

मतविभाजनाचा फटका
■ एरंडोल विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या पंचरंगी लढतीतील मतविभाजनाचा फटका शिवसेनेला बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ झाल्यामुळे डॉ.सतीश भास्करराव पाटील यांचा विजय झाला. एकंदरीत पंचरंगी सामन्यात भाजपा, मनसे या पक्षांच्या उमेदवारांनी अपेक्षेपेक्षा अधिक मते घेतल्यामुळे शिवसेनेचे निवडणुकीचे गणित बदलले व त्यांना पराभव पत्करावा लागला. विजयी उमेदवार डॉ.पाटील यांना पारोळा शहरासह ग्रामीण भागात, तसेच कासोदा, गिरड-आमडदे जि.प.गट या ठिकाणी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच मुस्लीम मतदारांनीदेखील घड्याळाच्या बाजूने कौल दिला आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पाटील यांचा पराभव झाला. मात्र ही माझी शेवटची निवडणूक आहे, या त्यांनी दिलेल्या हाकेला मतदारांनी प्रतिसाद दिला.. उलटपक्षी अति आत्मविश्वास, दुभंगलेली युती, भाजपाचे सुडाचे राजकारण, मत विनभाजनामुळे बदललेली समीकरणे यामुळे शिवसेनेचे चिमणराव पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपाने ऐनवेळी शिवसेनेचे माजी जि.प.उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या हातात 'कमळ' दिले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले. याचा लाभ उमेदवाराचे मताधिक्य वाढण्यास झाला. मात्र तरी विजय मिळविता आला नाही. परंतु त्यामुळे चिमणराव पाटील यांच्या विजयाचे गणित बिघडले हे निश्चित आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मतदारसंघात पायाला भिंगरी बांधून सतत जनसंपर्क ठेवणारे मनसेचे युवा नेते नरेंद्र पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत प्रथमच एंट्री करून प्रतिस्पध्र्यांना कडवे आव्हान दिले. माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनीदेखील पुतण्यासाठी जिवाचे रान केले. मात्र अपेक्षित यश मिळण्यात तेही अयशस्वी ठरले. त्यांच्या प्रचाराच्या व्यूहरचनेमुळे एरंडोलमध्ये 'रेल्वे इंजीन' बाजी मारणार असे चित्र निर्माण झाले होते. माजी आमदार पारूताई वाघ यांचे पुत्र डॉ.प्रवीण वाघ यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी 'पंजा' दारोदार पोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फारसा प्रभाव मतदारसंघात कुठेही दिसून आला नाही. निवडणुकीच्या रिंगणातील इतर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला नाही. पण दुसर्या क्रमांकावर असलेल्या चिमणराव पाटलांना मात्र ते अडथळ्याचे जरूर ठरले. त्यामुळे अपक्षांनीही आपले महत्त्व पटविल्याचे दिसते. या निकालावरून भविष्यात तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच नव्याने होणार्या घडामोडींमुळे मतदारसंघाचा कायापालट होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.