मिरचीचा ‘तिखट’पणा उत्पादकांच्याच नशिबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:38+5:302021-09-13T04:16:38+5:30
जळगाव : हिरव्या मिरचीची आवक प्रचंड वाढल्याने, ती मातीमोल भावात विकण्यासह फेकून देण्याची वेळ आली आहे. जळगाव कृषी उत्पन्न ...

मिरचीचा ‘तिखट’पणा उत्पादकांच्याच नशिबी
जळगाव : हिरव्या मिरचीची आवक प्रचंड वाढल्याने, ती मातीमोल भावात विकण्यासह फेकून देण्याची वेळ आली आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन रुपये प्रति किलोने हिरवी मिरची खरेदी केली जात असून, उठाव नसल्याने दररोज चार ते पाच ट्रॅक्टरभर मिरची फेकून दिली जात आहे.
गेल्या महिन्याभरापासून हिरव्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. त्यात आता तर दररोज १० टन हिरवी मिरची येत असल्याने आलेल्या सर्व मिरच्या खरेदी होत नाही. त्यामुळे त्यांना भाव मिळणे कठीण होत आहे.
उर्वरित मालाचे करायचे काय?
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागासह सटाणा, मालेगाव, सिल्लोड, अजिंठा इत्यादी भागांतून मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीची आवक सुरू आहे. पहाटे लिलावाच्या वेळी उत्पादकांकडून दोन रुपये प्रति किलोने मिरचीची खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे, ५० रुपयांना पिशवीभर मिरची विकली जात आहे. एक तर आवक जास्त व मिरचीला सध्या उठाव नसल्याने भाव तर गडगडलेच आहे, शिवाय आलेल्या पूर्ण मालाची खरेदीही होत नाही. त्यामुळे बाजार समितीमध्येच हिरव्या मिरची सोडून उत्पादक निघून जातात. परिणामी, बाजार समितीमधील कर्मचारीच दररोज चार ते पाच ट्रॅक्टर हिरव्या मिरच्या फेकून देत आहे.
उत्पादकांच्या पदरी निराशा
यंदा मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीची लागवड करण्यात आली. पावसामुळे उत्पादनही चांगले आले. मात्र, तिला भाव मिळत नसल्याने उत्पादकांची चांगलीच निराशा होत आहे. एक तर भाव मिळत नाही व माल खरेदी न झाल्यास, तो परत नेणेही परवडणारे नसल्याने ते येथेच माल सोडून जात आहे. त्यामुळे उत्पादकांचा उत्पादन खर्च तर दूरच भाडेही निघत नसल्याची स्थिती आहे.
सध्या हिरव्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, दोन रुपये प्रति किलो भाव तिला मिळत आहे. आलेला माल पूर्ण खरेदी न झाल्यास तो फेकून द्यावा लागत आहे.
- वासू पाटील, भाजीपाला विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती.