स्पेशल रेल्वे रुळावर, पण प्रवाशांच्या खिशाला दुप्पट फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:02+5:302021-02-05T06:01:02+5:30
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून बंद असलेली रेल्वेसेवा आता टप्प्या-टप्प्याने सुरू होत आहे. रेल्वे प्रशासनातर्फे सुरू करण्यात ...

स्पेशल रेल्वे रुळावर, पण प्रवाशांच्या खिशाला दुप्पट फटका
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून बंद असलेली रेल्वेसेवा आता टप्प्या-टप्प्याने सुरू होत आहे. रेल्वे प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या या स्पेशल रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकीट बंद असून, तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशानांच प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, या स्पेशल गाड्यांच्या तिकिटाचे दर पूर्वीच्या गाड्यांपेक्षा जास्त असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलांच फटका बसत आहे. सरकारकडूनच नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या भावना प्रवाशांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.
सध्या रेल्वेतर्फे भुसावळ विभागातून २६० स्पेशल रेल्वे गाड्या धावत आहेत. तर कोरोनाच्या पूर्वी ३३० रेल्वे गाड्या धावत होत्या. कोरोनाच्या पार्शभूमीवर सुरू करण्यात आलेल्या गाड्यांना मात्र रेल्वेतर्फे ३० ते ३५ टक्के जादा भाडे घेण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात या स्पेशल रेल्वे धावत असल्यामुळे जादा भाडे आकारण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तसेच बहुतांश स्पेशल गाड्या या पूर्वीच्या नावानेच धावत असून, फक्त या गाड्यांच्या क्रमांकाला पुढे शून्य जोडण्यात आला आहे. तसेच सर्व सामान्य प्रवाशासांठी जनरल तिकीट काढून प्रवासाला बंदी आहे. आरक्षण तिकीट असणाऱ्यानाच गाडीत प्रवेश देण्यात येत असल्यामुळे या गाड्यांना स्पेशल दर्जा देण्यात आला आहे. सध्या धावणाऱ्या गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे, या गाड्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जादा भाडेवाढीमुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे.
कोरोनापू्र्वी : ३३० रेल्वे.
आता धावतात : २६० रेल्वे
इन्फो :
छोट्या आणि मोठ्या अंतरातील भाड्यात वाढ
रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना काळात धावणाऱ्या या स्पेशल गाड्यांना ३० ते ३५ टक्के जादा भाडे आकारण्यात येत आहे. तसेच ही तात्पुरती भाडेवाढ असल्याचे भुसावळ जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले. तसेच काही ठरावीक उत्सव गाड्यानांच ही भाडेवाढ असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
छोट्या अंतरासाठी
पूर्वी जळगाव ते नाशिक या छोट्या अंतरासाठी आरक्षित तिकिटाला १४० ते १५० रुपये भाडे लागायचे. मात्र, आता स्पेशल गाड्यांना १८० ते २०० रुपये भाडे लागत आहे. यात सुमारे ३० ते ३५ रुपयांचा फरक पडला आहे.
मोठ्या अंतरासाठी
तसेच जळगाव ते दिल्ली या मोठ्या अंतरासाठी पूर्वी एका प्रवाशाला कुठल्याही एक्सप्रेसला साधारणत: ६५० ते ७०० रुपये लागायचे. मात्र, सध्या सुरू असलेल्या स्पेशल गाड्यांना ८०० ते ९०० रुपयांपर्यंत भाडे लागत आहे.
इन्फो :
सद्या सुरू असलेल्या स्पेशल रेल्वे सर्व सामान्यासाठी कुठल्याही प्रकारे उपयोगाच्या नाहीत. जर बाहेरगावी जायचे ठरविले तर, या स्पेशल गाड्यांना बसप्रमाणे जादा भाडे लागत असल्यामुळे, आर्थिक भुर्दंड बसत आहे.
विजय शिंदे, प्रवासी.
इन्फो :
सध्या कोरोना काळात सुरू असल्यामुळे या गाड्यांना जादा भाडे आकारण्यात येत आहे. काही स्पेशल गाड्यांना तर तिकीट रद्द केल्यावर पैसेही मिळत नाही. त्यामुळे स्पेशल गाड्या या गरिबासांठी नाहीत.
योगेश पाटील, प्रवासी