पितृपक्षातही विशेष खरेदी-विक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:33+5:302021-09-25T04:15:33+5:30
मुक्ताईनगर : बदलत्या काळानुसार लोकांचे विचार आणि कलही बदलत आहेत. विज्ञानयुगात रूढी व परंपरांना फाटा देऊन सोईनुसार ...

पितृपक्षातही विशेष खरेदी-विक्री सुरू
मुक्ताईनगर : बदलत्या काळानुसार लोकांचे विचार आणि कलही बदलत आहेत. विज्ञानयुगात रूढी व परंपरांना फाटा देऊन सोईनुसार सुलभ जीवन जगण्याचा कल वाढला आहे. एक काळ असा होता की पितृपक्षात खरेदी-विक्री करणे टाळले जायचे. परंतु कालानुरूप बदलत्या मानसिकतेत आता पितृपक्षात खरेदी-विक्री होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
गुरुवारी येथील दुय्यम निबंधक खरेदी-विक्री कार्यालयात आठ जणांचे खरेदीखत नोंदविले गेले. सराफी दुकानातही सोने-चांदी खरेदी व्यवसाय नेहमीप्रमाणे दिसून आला, तर कापड आणि रेडिमेडच्या दुकानात गर्दी पहावयास मिळाली.
पितृपक्ष म्हणजे पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्रकाळ. या काळात शुभकार्य कार्य करणे अशुभ असल्याचे समज वजा मान्यता आहे. पितृपक्षात खरेदी-विक्री करू नये ही जुनी परंपरा आहे. परंतु पुरोगामी विज्ञानवादी लोकांकडून आधुनिक काळात या गैरसमजाला फाटा दिला जात आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून या काळातही अनेकजण खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील खरेदी व व्यवसायावर सध्या तरी पितृपक्षाचा विशेष परिणाम दिसून येत नाही.
सोमवारपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. या काळातील हे पंधरा दिवस शुभकार्यासाठी वाईट मानले जातात. त्या काळात सोने, जमीन, घर, वाहन आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी-विक्री केली जात नाही. विवाहाचे मुहूर्तही टाळले जातात. मात्र आता एकंदरीत बाजारपेठेतील व्यवहार नियमितपणे सुरू दिसून येत आहे.
बाजारपेठेत सध्या मंदी कायम आहे. असे असले तरी ग्राहक गरजेनुसार खरेदी करीत आहेत. पितृपक्षात खरेदी केली जात नाही, अशी धारणा आहे. परंतु तसे नाही ग्राहकी आणि व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू आहे.
-विपुल जैन, रेडिमेड व्यावसायिक
पितृपक्षात सोने खरेदी न करण्याची धारणा बदलली आहे. काळानुरूप ग्राहकांमध्ये बदल झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पितृपक्षातही सोने खरेदीसाठी ग्राहक सराफाकडे येत आहेत. सध्या तर सोन्याचे दर अस्थिर असल्याने फरक आणि फायदा पाहून ग्राहक जुन्या रूढी परंपरांना फाटा देत आहेत.
-गजानन शुरपाटने, सोने व चांदी विक्रेता.