भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला. मात्र, ‘खोडकिडी’ने शेतकरी राजाची चिंता वाढवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:50+5:302021-09-09T04:22:50+5:30
जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्यामुळे, अनेक शेतकरी बांधव सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. जिल्ह्यात यंदा ...

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला. मात्र, ‘खोडकिडी’ने शेतकरी राजाची चिंता वाढवली
जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्यामुळे, अनेक शेतकरी बांधव सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. जिल्ह्यात यंदा साडेसोळा हजार क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही सोयाबीन पिकावर खोडकीड अळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचे सोयाबीन उत्पादन शेतकरी बांधवांतर्फे सांगण्यात येत आहे.
यंदा सुरुवातीपासून जिल्ह्याचे पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. आता तर पावसाने थैमान घातले असून, धरणे-जलाशये तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना हिवाळी आणि उन्हाळी पीकही घेता येणार आहे. अशा प्रकारे वरुणराजाने एकीकडे शेतकरी बांधवांची पाण्याची चिंता दूर केली असताना, सोयाबीनवर पडलेल्या ‘खोडकीड’ने मात्र चिंता वाढवली आहे. खोडकीडसह गर्टल-बीटल या किडीचाही मारा सोयाबीन पिकांवर होत आहे. यामुळे पिकांच्या वाढीची क्षमता खुंटून, उत्पादन कमी होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सोयाबीनवर केलेला खर्चही निघणार नसल्याची शक्यता शेतकरी बांधवांनी व्यक्त केली असून, शासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
इन्फो :
पेरणीवर लावलेला पैसा निघतो की नाही..
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत सोयाबीनला भाव मिळत असला तरी, याचा फायदा शेतकऱ्यांना नसून, व्यापाऱ्यांना होत आहे.
-सुधीर पाटील, शेतकरी
सोयाबीन पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. कितीही फवारण्या केल्या तरी उपयोग नाही. त्यामुळे उत्पादन घटणार आहे. त्यात जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, सरकारने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची गरज आहे.
- संजय ढाके, शेतकरी
इन्फो :
सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी :
एकीकडे खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत असताना, दुसरीकडे जास्त पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा सडत आहेत. हे प्रमाण ५० टक्के आहे. तसेच शेतात पाणी साचत आहे, यामुळे पिके खराब होत आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची नुकसानभरपाई द्यावी तसेच उडीद व मुगाचे मोठे नुकसान झाले आहे. जादा पावसामुळे हातातले पीक वाया गेले आहे. त्यामुळे सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.
इन्फो :
कृषी अधिकाऱ्यांचा कोट :
जिल्ह्यात यंदा साडेसोळा हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सध्या सोयाबीनवर किडीचा फारसा प्रभाव नाही.
-संभाजी ठाकूर, कृषी अधिकारी, जळगाव
इन्फो :
काय आहे ‘खोडकीड’
सोयबीन पिकावर लागलेल्या खोडकिडीत ‘खोडमाशी’ आढळून येत आहे. ही अळी सुरुवातीला पानाच्या शिरेला छिद्र करते. नंतर ही अळी पानाच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते. ही मुळे पिकांचे नुकसान होऊन, उत्पादन घटण्याची शक्यता असते.
इन्फो :
खोडकिडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर
- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले की, सोयाबीनचे पीक सध्या दोन ते अडीच महिन्यांचे झाले असून, जसजसे पिकांना शेंगा येत आहेत, तसतसे खोडकिडीचे प्रमाणही वाढत आहे.
- यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बाजारात विविध प्रकारची महागडी रासायनिक औषधे विक्रीला आली आहेत. दहा ते पंधरा लिटरपर्यंत या औषधांची बाटली असून, या महाग औषधांची फवारणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.