चाळीसगावला यंदा पावणेतीन लाख बियाणे पाकिटांचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST2021-05-25T04:17:24+5:302021-05-25T04:17:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : खरिपाच्या लागवडीसाठी शेती-शिवार सज्ज झाले असून मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यावर्षीही खरिपाच्या ...

Sow 53 lakh seed packets to Chalisgaon this year | चाळीसगावला यंदा पावणेतीन लाख बियाणे पाकिटांचा पेरा

चाळीसगावला यंदा पावणेतीन लाख बियाणे पाकिटांचा पेरा

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : खरिपाच्या लागवडीसाठी शेती-शिवार सज्ज झाले असून मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यावर्षीही खरिपाच्या लागवडीत कपाशीचाच वरचष्मा राहणार असून मका लागवडीचे क्षेत्र १० ते १५ टक्क्यांनी घटणार आहे. दोन लाख ८७ हजार ८५० कपाशी बियाणे पाकिटांचा पेरा केला जाणार आहे. यावर्षी रासायनिक खतांचा १० टक्के कमी पुरवठा होणार असल्याने टंचाई जाणवणार आहे.

गतवर्षीच्या खरिपात मका लागवडीचे क्षेत्र वधारले असले तरी ते कपाशीच्या तुलनेत कमीच होते. यंदाही मका लागवडीचे क्षेत्र आणखी घटणार असल्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. कोरडवाहू व बागायती कपाशीचे क्षेत्र मात्र वाढणार आहे. यावर्षीही बळीराजाची दारोमदार ‘पांढऱ्या सोन्यावरच’ राहणार असल्याने तालुका कृषी विभागाने खरिपाचे नियोजन केले आहे.

९० हजार हेक्टरवर बहरणार खरिपाचा हंगाम

चाळीसगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख २१ हजार ९०४ हेक्टर इतके आहे. यापैकी ९० हजार ३१८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा होणे अपेक्षित आहे.

१...यावर्षी तालुक्यात २ लाख ८७ हजार ८५० कपाशी बियाणे पाकिटे लागणार आहेत. कपाशीचे २०० वाण बाजारात उपलब्ध असून शेतकऱ्यांनी एकाच बियाणाचा आग्रह धरू नये. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

२...संकरित कापूस बीजी-२ चे दोन लाख ८५ हजार ८३५ तर सुधारित कापूस २०१५ असे बियाणे पाकिटे लागणार आहेत.

३...मान्सूनपूर्व कपाशी लागवडीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. १ जूननंतर असा पेरा करावा, अशी माहिती तालुका कृषी आधिकारी सी. डी. साठे व पंचायत समिती विभागाचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

४...मका लागवडीचे क्षेत्र घटणार असले तरी काही प्रमाणात भूईमुग, सोयाबीन पेऱ्याचे क्षेत्र वाढणार आहे.

........

चौकट

काळ्या बाजारावर राहणार नजर

तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

बियाणे, खते आणि कीटकनाशकांत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. यासाठी कृषी विभागाची काळ्या बाजारावर करडी नजर राहणार आहे. यासाठी पंचायत समितीमध्ये तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत तक्रार निवारण कक्षात शेतकरी तक्रार नोंदवू शकतात. भरारी पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

.........

चौकट

खतांची टंचाई जाणवणार, १० टक्के कमी पुरवठा

अनुदानित रासायनिक खतांचा १० टक्के कमी वापर या धोरणानुसार जिल्हास्तरावरून रासायनिक खतांच्या पुरवठ्याचे नियोजन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासूनच खत टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

• एकूण २८ हजार ३८४ मेट्रिक टन खताची गरज यंदाच्या खरीप हंगामासाठी निर्धारीत केली आहे.

• खतांमध्ये युरिया ११६३९ मेट्रिक टन, सुपर फॉस्फेट ५००२, पोटॅश ४१६७, डीएपी १८००, एएमपीके ६०४५ अशा एकूण २८ हजार मेट्रिक टन खताची गरज आहे.

• खताची मागणी आणि पुरवठा हे चक्र कोरोनामुळे बिघडण्याची शक्यता आहे.

..........

महत्त्वाची चौकट

गेल्यावर्षीची बनावट खतांची कारवाई गुलदस्त्यात

बनावट खते, बियाणे व कीटकनाशके देऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसगत केली जाते. हे दरवर्षीचे रडगाणे आहे. गेल्यावर्षी लाखो रुपये किमतीचा बनावट खतांचा साठा चाळीसगावी हस्तगत केला गेला. मात्रए त्याबाबत काय कारवाई झाली, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळेच कोरोना काळात अगोदरच पिचलेल्या शेतकऱ्यांना बनावट खतांव्दारे लुबाडणूक होण्याची भीती वाटत आहे. कृषी विभागाने अलर्ट रहावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Web Title: Sow 53 lakh seed packets to Chalisgaon this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.