विमानतळावर बसणार अत्याधुनिक रडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST2021-06-19T04:12:00+5:302021-06-19T04:12:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पाऊस व अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, हवामान विभागाकडून ...

Sophisticated radar to be installed at the airport | विमानतळावर बसणार अत्याधुनिक रडार

विमानतळावर बसणार अत्याधुनिक रडार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पाऊस व अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, हवामान विभागाकडून अनेकदा अंदाज वर्तविल्यावर देखील अंदाज चुकतात. यामुळे शेतीला मोठा फटका बसत असतो. अशा परिस्थितीत जिल्ह्यात स्थानिक पातळीवर रडार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली तर त्याचा फायदा कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होवू शकतो. विमानतळ प्राधिकरणातर्फे जळगाव विमानतळावर रडार यंत्रणा बसविण्यासाठी हालचाली सुरु आहे. यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच मंजूरी मिळून याठिकाणी रडार यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती जळगाव विमानतळ प्राधीकरणाचे संचालक सुनील मुगरीवार यांनी दिली.

ही यंत्रणा विमानतळ प्राधिकरणासाठी कार्यान्वित केली जाणार असली तरी याचा फायदा विमानतळ प्राधिकरणाच्या सुरक्षेसोबतच जिल्ह्यातील कृषी क्षेत्रासाठी केला जाणार आहे. जिल्ह्यासह संपुर्ण खान्देशात रडार यंत्रणा कोणत्याही जिल्ह्यात बसविण्यात आलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील हवामानाचा अचूक अंदाज वर्तविताना हवामान विभागाचे अंदाज देखील चुकत असतात. यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या चक्रीवादळांची माहिती, अवकाळीची माहिती ऐनवेळी उपलब्ध होत नसल्याने शेतीचे दरवर्षी मोठे नुकसान होत असते. जर रडार यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित झाली तर त्याचा फायदा कृषी क्षेत्राला हवामानाचा अचूक अंदाज मिळविण्यासाठी होवू शकणार आहे.

रडार यंत्रणा काम कशी करते

ही रेडियो लहरी वापरून आकाशातील वस्तूंचे चित्र तयार करण्यासाठीची यंत्रणा आहे. या रडारमधून पाठवलेल्या तरंग लहरी एखाद्या वस्तूवर आदळून (उदा. विमान, ढग व इतर ठोस वस्तू) परततात, तेव्हा त्यातल्या तरंगलांबीचा फरक मोजला जातो. त्यामुळे वस्तूचा वेग, आकार, घनता आदी अनेक बाबी अतिशय अचूक नोंदवता येतात.

होणारे फायदे

मुख्यत्वे करून रडारचा वापर विमानतळ प्राधिकरण व सैन्य हे आपल्या सुरक्षेसाठी करत असतात. तर रडारमुळे हवामानाचा अंदाज देखील घेतला जात असतो. राज्यातील मान्सून व हवामानाच्या बदलत्या पॅटर्नमुळे गाव, तालुका व जिल्हानिहाय वातावरण मोठ्या प्रमाणात बदलत आहे. रडार यंत्रणेमुळे सुमारे १०० ते २५० किमी परिसरातील ढगफुटी, गारपीट व वादळ अशा नैसर्गिक आपत्तींपासून काही दिवसआधीच पुर्वसूचना उपलब्ध होवू शकते. यामुळे कृषी उद्योग व शेतकऱ्यांना याचा फायदा होवू शकणार आहे.

हवामान विभागाकडून मिळणार मंजूरी ?

विमानतळ प्राधिकरणाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याप्रस्तावात जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला नैसर्गिक संकटामुळे किती प्रमाणात नुकसान होते याची देखील माहिती देण्यात आली आहे. रडारयंत्रणा जरी जळगाव विमानतळावर बसविण्यात येत असली तरी यामुळे खान्देशातील धुळे, नंदुरबार या जिल्ह्याला देखील फायदा होणार आहे. हवामान विभागाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकणार आहे.

Web Title: Sophisticated radar to be installed at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.