गिरणेचे पाणी उतरताच वाळूउपसा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:33+5:302021-09-23T04:18:33+5:30
महसुल प्रशासनाने गिरणा नदीला सोडले वाऱ्यावर : ‘ॲक्शन प्लॅन’ची घोषणा हवेतच विरली; ठेका नसतानाही शेकडो दररोज शेकडो ब्रास उपसा ...

गिरणेचे पाणी उतरताच वाळूउपसा सुरू
महसुल प्रशासनाने गिरणा नदीला सोडले वाऱ्यावर : ‘ॲक्शन प्लॅन’ची घोषणा हवेतच विरली; ठेका नसतानाही शेकडो दररोज शेकडो ब्रास उपसा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, बांभोरी या भागातील गिरणा नदीपात्रातील पुराचे पाणी कमी होताच, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूउपसा सुरू झाला आहे. विशेष म्हणजे भर दिवसा उपसा होवून जळगाव शहरातून सर्रासपणे वाळूने भरलेले डंपर व ट्रॅक्टर ये-जा करत असताना देखील या प्रश्नाकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक दिवसांपासून महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई देखील केली जात नसून, प्रशासनाने एकप्रकारे वाळूमाफियांना मोकळे रानच दिल्याचे दिसून येत आहे.
वाळूउपसा करण्यासोबतच गिरणा काठावरील अनेक गावांमध्ये वाळूमाफियांकडून वाळूचे साठे केले जात आहेत. नदीला पाणी येताच या साठ्यांवरून उपसा केला जात आहे. नदीला पाणी आल्यानंतर वाळू मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत साठ्यांवरील वाळू जास्त भावाने विक्री करण्याचा गोरखधंदा वाळूमाफियांकडून सुरू असून, या धंद्याला प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांकडून अभय देण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे थेट नदीत पाणी असतानाही जेसीबीच्या साहाय्याने उपसा केला जात आहे.
ठेका नसतानाही दररोज केला जातोय अनधिकृतरित्या शेकडो ब्रास उपसा
जिल्ह्यात वाळूउपसासाठी कोणताही ठेका प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही. मात्र, तरीही गिरणा नदीपात्रातील आव्हाणे, खेडी, निमखेडी व बांभोरी परिसरातून दररोज शेकडो ब्रास वाळूउपसा केला जात आहे. एका दिवसात तब्बल २० लाखांहून अधिकच्या किमतीची वाळू अनधिकृतपणे उचलली जात आहे. यामुळे प्रशासनाचा महसूल तर बुडतच आहे. मात्र, गिरणा नदीपात्रातील उपसा होत असल्याने भूजलपातळी देखील खालावत आहे. गिरणा पात्रात अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडून अनेक ठिकाणी खडक देखील लागला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ॲक्शन प्लॅन’ नावालाच
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मध्यंतरी अवैध वाळूउपशावर बऱ्यापैकी लगाम लावली होती. तसेच आव्हाणे, निमखेडी भागातील वाळूउपसा रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’देखील तयार केला होता. मात्र, वर्षभरातच हा ॲक्शन प्लॅन केवळ कागदावरच राहिला आहे. महसूल प्रशासनाकडून गिरणेतील अनधिकृत वाळूउपसा रोखण्यात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वाळूउपशाबाबत प्रशासनावर टीका झाल्यानंतर एखाद कारवाई करून, औपचारिकता दाखवली जात आहे.
१. शेतकऱ्यांना दाखवली जाते ‘दादागिरी’
वडनगरी भागातील एका शेतकऱ्याचा गोठ्यासमोर अनेक वाळूमाफियांनी गिरणेतून उपसा करून, ठिय्या मांडले आहेत. शेतकऱ्यांकडून याबाबत विरोध होताच शेतकऱ्यांना दादागिरी दाखवली जात आहे. शेतकरी देखील घाबरून याबाबत कोणतीही तक्रार करायला पुढे येत नाहीत.
२. ग्रामदक्षता समिती नावालाच
गावातील वाळूउपसा रोखण्याची जबाबदारी ही गावातील ग्राम दक्षता समितीवर सोपविण्यात आली होती. मात्र, या समित्या केवळ नावालाच ठरल्या असून, या समित्यांकडूनच वाळूमाफियांना खुली सूट दिली जात आहे. प्रशासनाने ग्रामदक्षता समित्यांवर जबाबदारी सोपवून आपल्या जबाबदारीपासून पळ काढला आहे.