रेल्वेगाडी येताच पुलाखालची वाहतूक होते ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:19+5:302021-07-01T04:13:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : जळगाव शहरातून ममुराबाद-विदगावकडे जाणारा रस्ता रेल्वेच्या पुलाखालून जातो. पुलावरून एखादी प्रवासी रेल्वे गाडी जात ...

रेल्वेगाडी येताच पुलाखालची वाहतूक होते ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : जळगाव शहरातून ममुराबाद-विदगावकडे जाणारा रस्ता रेल्वेच्या पुलाखालून जातो. पुलावरून एखादी प्रवासी रेल्वे गाडी जात असताना पुन्हाखालील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबत असल्याचा प्रसंग दिवसभरात अनेकवेळा घडतो. धावत्या रेल्वेच्या शौचालयामधील मलमूत्र अंगावर पडण्याचा किळसवाणा प्रकार टाळण्यासाठी दुचाकी व चारचाकीचालक पुलाच्या दुतर्फा थांबत असल्याने त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते.
लोहमार्ग फाटकमुक्त करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाकडून बऱ्याच ठिकाणी लहान व मोठे उड्डाण तसेच भूमिगत पुलांचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात खर्चही केला जात आहे. सुदैवाने जळगावहून ममुराबाद- विदगावमार्गे यावल तसेच चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर आधीच रेल्वे पुलाची सोय आहे. काळाची गरज ओळखून जळगाव ते भुसावळदरम्यान टाकण्यात येत असलेल्या चौथ्या लोहमार्गासाठी सदर पुलाचा अलीकडेच विस्तार झाला आहे. त्यासाठी बऱ्याच ठिकाणी नवीन मोठे गर्डरदेखील टाकण्यात आले आहेत. मात्र, ब्रिटिशकाळापासून अस्तित्वात असलेले लोखंडी गर्डर बदलण्यात आले नाहीत. याच गर्डरमधून रेल्वेच्या शौचालयामधील मलमूत्र थेट पुलाच्या खाली पडत असल्याचे दिसून येते. रेल्वेगाडी काहीवेळा सिग्नल न मिळाल्याने नेमकी पुलावर येऊन थांबते तेव्हा मोठा बाका प्रसंग उद्भवतो. पुलाखालून ये- जा करणाऱ्या वाहनधारकांना रेल्वे जात नाही तोपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते. पूल असतानाही फाटक बंद झाल्यागत परिस्थिती दररोज निर्माण होत असल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत अनेकवेळा वाहतूक कोंडीचा प्रकार घडतो. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने एकतर लोखंडी गर्डर बदलण्याची कार्यवाही करावी किंवा गर्डरखाली पत्रा बसवावा, अशी मागणी परिसरातील वाहनधारकांनी केली आहे.
--------------------
फोटो कॅप्शन - जळगाव- ममुराबाद रस्त्यावरील रेल्वेपुलाखाली दररोज अशाप्रकारे फाटक नसतानाही वाहने थांबताना दिसून येतात. (जितेंद्र पाटील)