अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST2021-08-18T04:22:18+5:302021-08-18T04:22:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड रुग्ण संख्या कमी झाल्याने जिल्हाभरात नियम शिथील करण्यात आहे. मात्र, या अनलॉकमध्ये अपघातांची ...

अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी !
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड रुग्ण संख्या कमी झाल्याने जिल्हाभरात नियम शिथील करण्यात आहे. मात्र, या अनलॉकमध्ये अपघातांची संख्या प्रचंड वाढली असून त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही धक्कादायक आहे. यात विविध कारणांनी हे अपघात होत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अपघात विभागात मात्र, रोजचीच गर्दी प्रचंड वाढली आहे. यात आताची परिस्थिती बघता नियम काही प्रमाणात शिथील झाल्यानंतर जून महिन्यापर्यंत ६२ जणांचा जिल्हाभरात अपघातात मृत्यू झाला आहे.
शासनाच्या विश्लेषणानुसार २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये जागीच ठार होणार्या अपघातांची संख्या ५० तर गंभीर अपघातांची संख्या ३५ ने तर साध्या अपघातांची संख्या ०५ ने वाढली आहे. एकूणन अपघातात ९१ ने वाढ नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोजच किरकोळ आणि गंभीर अपघातानंतर नातेवाईकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
कोविडमध्येही अपघात विभाग
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोविडच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात केवळ काही नॉन कोविड सुविधेसाठी पूर्णवेळ सुरू होते. आता या ठिकाणी नॉन कोविड सुविधा सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत अपघातांची रोजची संख्या अगदीच कमी होती. नेत्र कक्षात अपघात विभाग सुरू करण्यात आला होता. आता नियमीत आपात्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे.
अनलॉक आधी रोजचे रुग्ण : ०२
अनलॉकनंतर रोजचे रुग्ण : १०
अपघातांची आकडेवारी
जून २०२० : अपघात ३२७, जखमी ४८५, मृत्यू २१३
जून २०२१ : अपघात ४१८, जखमी ५५७, मृत्यू २०९
दारू हेही एक कारण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोज आता किमान दहा जखमी दाखल होत आहे. कोविड काळात हेच प्रमाण दोन ते तीन होते. या मागे विविध कारणे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यात दारू पिऊन वाहन चालवणे, रस्ते खराब असणे, समोरा समोर धडक होणे, अशा विविध अपघातांमध्येच लोक अधिक जखमी होत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर यांनी सांगितले.