जळगाव : आईच्या नावावरील घर बक्षीसपत्राद्वारे स्वत:च्या नावावर झाल्यानंतर त्याची नोंद सीटी सर्व्हेच्या उताऱ्यावर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना नगरभूमापन कार्यालयातील परिरक्षण भूमापक प्रमोद प्रभाकर नारखेडे (४९, रा.रामचंद्र नगर, ब्राम्हण सभा हॉलजवळ, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी रंघेहाथ पकडले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील कार्यालयात ही कारवाई झाली.दरम्यान, लाचेची रक्कम स्विकारली तर तक्रारदाराने हातातील पिशवी खाली पाडायची असे नियोजन होते, त्यानुसार तक्रारदाराने पिशवी खाली पाडली अन् नारखेडे जाळ्यात अडकला.याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे राहते घर बक्षीसपत्राद्वारे आईच्या नावावरुन स्वत:च्या झालेले आहे, मात्र सीटी सर्व्हेच्या उताºयावर त्याची नोंद झालेली नाही. ही नोंद करण्यासाठी तक्रारदार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नगरभूमापन कार्यालयात गेले असता तेथे नारखेडे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने याच आवारात असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जावून उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार केली.सायंकाळी रचला सापळतक्रारीनंतर जी.एम. ठाकूर यांनी सहकाऱ्यांमार्फत तक्रारीची पडताळणी केली, त्यानंतर सायंकाळी पोलीस निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, सहायक फौजदार रवींद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, सुरेश पाटील, सुनील पाटील, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी व ईश्वर धनगर यांनी कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराने नारखेडे याच्या हातात पैसे देताच त्याच्या हातातील पिशवी खाली पाडली. दरम्यान, या कारवाईनंतर पथकाने नारखेडेच्या घराची झडती घेतली असता काहीच आढळून आले नाही.
हातातील पिशवी खाली पाडताच लाचखोर जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 20:01 IST