पहूर येथील डॉक्टर व विजेच्या समस्या आठ दिवसांत सोडवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:56+5:302021-09-04T04:19:56+5:30
पहूर गाव अतिसंवेदनशील असून, राष्ट्रीय महामार्गावरील आहे. जवळपास पंचवीस ते तीस हजार लोकसंख्येचे गाव असून, सत्तर ते ऐंशी ...

पहूर येथील डॉक्टर व विजेच्या समस्या आठ दिवसांत सोडवा!
पहूर गाव अतिसंवेदनशील असून, राष्ट्रीय महामार्गावरील आहे. जवळपास पंचवीस ते तीस हजार लोकसंख्येचे गाव असून, सत्तर ते ऐंशी खेड्यांचा संपर्क आहे. अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी जागतिक अजिंठा लेणी येथून जवळच आहे. पर्यटकांची येथून नेहमी वर्दळ आहे. हजारो प्रवासांच्या दळणवळणासाठी केंद्रबिंदू आहे. मात्र, महिनाभरापासून पहूर रुग्णालय डॉक्टरांअभावी व वीज वितरण कार्यालय अधिकाऱ्यांविना रामभरोसे कामकाज सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचे आहेत. विजेचा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. साथीच्या आजाराने डोके वर काढले असल्याने रुग्णसंख्येत वाढ होत असून, डेंग्यूसदृश रुग्ण सापडत आहेत.
सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. हीच परिस्थिती वीज वितरण कार्यालयाची आहे. उपकार्यकारी अभियंता व सहायक अभियंता यांची पदे रिक्त आहेत. लाइनमन कर्मचाऱ्यांचे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे विजेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गाव अंधारात राहत आहे. हे ज्वलंत प्रश्न आपल्या स्तरारून आठ दिवसांत सोडवावेत, अन्यथा नागरिक व पदाधिकारी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतील व होणाऱ्या परिणामांस प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन सरपंच नीता पाटील यांच्या स्वाक्षरीने पेठ ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले आहे. याच निवेदनाची दुसरी प्रत जिल्हा शल्यचिकित्सक, महावितरण अधीक्षक अभियंता व पोलीस निरीक्षक पहूर यांना रवाना करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
आंदोलन करणाऱ्यांना समज
ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांअभावी रुग्णसेवा ठप्प आहे. साथीच्या आजाराचे काही रुग्ण प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात शुक्रवारी सकाळी आले; पण डॉक्टर नसल्याने प्राथमिक उपचारही रुग्णांवर झाले नाहीत. यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर पांढरे, सागर पाटील, विजय पांढरे, रामदास जाधव यांनी संतप्त भावनेतून रुग्णालयात आंदोलनाचा पवित्रा घेतला व डॉक्टर नसेल तर रुग्णालय बंद करा, अशा संतापजनक भावना व्यक्त केल्या. वेळीच समयसूचकता ठेवून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व पोउप निरीक्षक अमोल देवडे यांनी संबंधित आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेत त्यांना समज दिली व कायदा हातात घेऊ नका. सनदशीर मार्गाने लढा देण्याचे आवाहन त्यांना केले.