सोशल मीडियातून ‘सोशल सर्व्हीस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:43 IST2019-04-02T18:43:10+5:302019-04-02T18:43:35+5:30
स्तुत्य: व्हॉट्सअप ग्रुपने फुलविले दोन घटस्फोटीतांचे जीवन

सोशल मीडियातून ‘सोशल सर्व्हीस’
चोपडा : सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे सध्या माणसे एकमेकांपासून दुरावत आहेत. एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या गैरवापरातून तरुण भरकटत चालले आहेत. यामुळे समाजात समाजात अंधश्रद्धा, जातीयता, भेद, अश्लीलता पसरवली जात आहे, असे आपण सदैव ऐकत असतो. पण याच सोशल मीडियाच्या चांगल्या वापरामुळे समाजसेचा स्तुत्य उपक्रम चोपडा तालुक्यात घडला आहे.
जळगाव जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक बी.एन.पाटील जानवेकर (ह.मु.चोपडा) यांनी सेवानिवृत्ती नंतरचे जीवन समाजसेवेसाठी वाहून घेण्याचे ठरविले. सेवानिवृत्तीनंतर आपल्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा समाजातील गरजूंना व्हावा या उद्देशाने त्यांनी व्हॉट्सअपवर पुनर्विवाह व्हाट्सअॅप ग्रुप, घटस्फोटीत व्हॉट्सअॅप ग्रुप, खान्देशी विवाहोत्सुक व्हॉट्सअप ग्रुप आदी ग्रुप बनवून समाजातील गरजू , विवाहोत्सुक व घटस्फोटीत तरुण-तरुणींना एकत्र आणून त्यांच्या एकाकी जीवनाला जीवनसाथी मिळवून देऊन त्यांचे जीवन पुना बहरविण्याचे कार्य सुरू केले.
या कार्याचाच एक भाग म्हणून नुकतेच जळगाव येथील किरण संतोष पाटील व कल्याण येथील शुभांगी शिंदे यांचा पुनर्विवाह या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाटील यांनी घडवून आणला. किरण पाटील यांना दोन मुली असून त्या उच्च शिक्षण घेत आहेत व त्यांच्या पत्नी पाच वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाल्या आहेत. त्या मुलींना आई मिळवून देण्यासाठी तसेच किरण व शुभांगी यांच्या जीवनात परस्परांना आधारस्तंभ मिळवून देण्यासाठी या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाटील यांनी पुढाकार घेतला. दोन्हीकडच्या कुटुंबीयांना समजावले. एकत्र आणले. समुपदेशन केले. आणि याचाच परिपाक म्हणून या दोघांचा विवाह नुकताच एरंडोल तालुक्यातील पद्मालय या ठिकाणी गणपती मंदिरात साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी वधू, वराकडील कुटुंबीय व उपस्थितांनी या व्हाट्सअप ग्रुपचे व अॅडमिन भास्करराव नाना पाटील यांचे आभार मानले. याआधीही या ग्रुपच्या माध्यमातून अनेक विवाह पार पडले आहेत. समाजात उत्तम आदर्श घालून देणाऱ्या या ग्रुपचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.