सोशल मीडिया आपल्या भल्यासाठी, त्याचा विवेकशील वापर गरजेचा - विनायक पाचलग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:36 IST2020-08-10T15:35:23+5:302020-08-10T15:36:04+5:30
सोशल मीडियाचा वापर करण्याची पद्धती, वेळ लक्षात आली म्हणजे होणारे नुकसान टाळता येते.

सोशल मीडिया आपल्या भल्यासाठी, त्याचा विवेकशील वापर गरजेचा - विनायक पाचलग
भुसावळ : संपूर्ण विश्व आपल्या एका क्लिकवर आले आहे. यात माहिती व तंत्रज्ञानाचा मोठा साठा आहे. या सोशल मीडियाचा वापर करण्याची पद्धती, वेळ लक्षात आली म्हणजे होणारे नुकसान टाळता येते. तसेच सोशल मीडिया हा आपल्यासाठी भल्यासाठी आहे. त्याचा विवेकशील वापर होणे गरजेचे असल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे माहिती सल्लागार विनायक पाचलग यांनी सांगितले.
रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्यावतीने शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी द्वंद जीवनाचे या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानाचे सहावे पुष्प सोमवारी कोल्हापूर येथील मूळचे, पण सध्या पुणे येथे स्थायिक झालेले विनायक पाचलग यांनी गुंफले. प्रास्ताविक प्रेसिडेंट सुधाकर सनांसे यांनी केले. वक्त्यांंचा परिचय सुनील वानखेडे यांनी करून दिला.
यावेळी बोलताना विनायक पाचलग म्हणाले की, इंटरनेट साधन हे केव्हा वापरले पाहिजे हे ठरलेले आहे. सोशल मीडिया वापरण्याची मात्र वेळ नाही हे केव्हाही आपण त्याचा वापर करतो. या सोशल मीडियाचे वेगळे वेगळे लेव्हल असून, गुगलही त्याची बालवाडी आहे. गुगलमध्ये जवळपास ५५ वेगळे त्यांचे प्रॉडक्ट असून, त्याचा वापर योग्य पद्धतीने कसा करायचा याबाबतची माहिती त्यांनी दिली. यामध्ये गुगल सर्च, गुगल ट्रेन्डस, गुगल इमेजेस तसेच यू ट्यूब, स्कॉलर गुगल, गुगल कीप असे विविध अॅपची माहिती दिली. फेसबूक ट्विटर इंस्टाग्राम हे चांगले वाटत असले तरी यामध्ये आभासी चित्र निर्माण केले जाते. यामध्ये असलेले सर्वच खरे असेल असे नाही. आपण एखादी पोस्ट व्हाट्सअप पाहिली तर ती व्हायरल करण्यापूर्वी थोडा विचार करा. याबाबतची पडताळणी करा. नंतरच पुढे पाठवा. म्हणजे यामधून विघातक होणारे परिणाम टाळता येऊ शकतात. तसेच आपल्याला एखादा विषय मांडायचा असेल तर 'चेंज डॉट ओआरजी' या वेबसाईटवर मांडा. त्याची दखल संपूर्ण विश्वात घेतली जाते. वेळप्रसंगी त्यावर ती चर्चा होत असते.
फेसबुक, ट्विटर वापरण्याच्या ट्रिक्स यावेळी त्यांनी दिल्या. तसेच आपल्या अकाउंटचे टू स्टेप व्हेरिफिकेशन नेहमी आॅन असले पाहिजे. त्यामुळे आपल्याला अकाउंटला हॅक कोणीही करू शकत नाही किंवा प्रयत्न झाला तत्काळ याची माहिती मिळते. तसेच फेक अकाउंटसुद्धा ओळखता आले पाहिजे. त्याबाबतची माहिती यावेळी दिली.
लिंकइन, मिक्स, पिन्टत्रेस्ट, टेलिग्राम, क्वोरा, इंस्टाग्राम टेड, पॉकेट, गुगल कीप या अॅपची माहिती सांगून सोशल मीडियावरून वाचणारा वेळ याठिकाणी घालवला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात माहितीचा खजाना मिळतो. आपले ज्ञान वाढते. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या लोकांचे संभाषण व आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे यावर असतात. त्यामुळे प्रत्येकाने याचा वापर केलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितल.े
सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी, तर आभार डॉ.गोपाळ सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅलीचे सेक्रेटरी राम पंजाबी, प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रदीप सोनवणे यांनी परिश्रम घेतले.