तथाकथित मेडिकल ऑफिसरने अनेकांना गंडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:55+5:302021-09-23T04:19:55+5:30
प्रमोद पाटील कासोदा : "मेडिकल ऑफिसर असल्याचे सांगून फसविणाऱ्या मयुरी मणियार हिने आतापर्यंत अनेकांना फसविले असल्याचे समोर आले ...

तथाकथित मेडिकल ऑफिसरने अनेकांना गंडवले
प्रमोद पाटील
कासोदा : "मेडिकल ऑफिसर असल्याचे सांगून फसविणाऱ्या मयुरी मणियार हिने आतापर्यंत अनेकांना फसविले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे मोठेच रॅकेट जिल्ह्यात या धंद्यात कार्यरत असावे, अशी चर्चा होत आहे.
मेडिकल ऑफिसर असल्याचे सांगून ऑनलाइन गंडा, अशा आशयाची बातमी २२ रोजी "लोकमत" मधून प्रसिद्ध झाली. यानंतर अनेकांनी आपण फसविलो गेलो असल्याचे सांगितले.
२१ रोजी येथील ऑनलाइन ट्रांझेक्शन करणाऱ्या एका व्यक्तीला कासोदा येथे मेडिकल ऑफिसर आहे, मला दवाखान्यात अर्जंट पैसे ट्रान्स्फर करावयाचे आहेत, तुम्ही पैसे ट्रान्स्फर करा, मी लागलीच पाठवते, असे सांगून पहिल्यांदा दोन हजार व लागलीच पुन्हा तीन हजार असे पांच हजार रुपये ट्रान्स्फर करून घेण्यात ही महिला यशस्वी झाली; परंतु हे पैसे मागण्यासाठी गेल्यावर हे बिंग फुटले, अशा नावाची कोणतीही मेडिकल ऑफिसर येथे नसल्याचे कळताच आपण गंडवले गेल्याचे संबंधिताच्या लक्षात आले.
उमेश नवाल यांनी सांगितले की, १२ जून रोजी याच नावाने त्यांनादेखील फोन आला होता; पण या नावाने आपल्या गावात मेडिकल ऑफिसर कुणीही नाही; परंतु नव्याने बदलून आली असेल म्हणून मी तेथील ड्रायव्हरकडून खात्री करून घेतल्याने वाचलो. येथील चिंचोले नामक एका दुकानातूनदेखील तीन हजार ट्रान्स्फर करून घेण्यात ही महिला यशस्वी झाली आहे.
याच गावातील एका बी फार्मसी झालेल्या युवतीलादेखील मी ऑनलाइन जाब मिळवून देते म्हणून कोरोना काळात आर्थिकद्दष्ट्या गंडवल्याची माहिती मिळाली आहे. ही महिला अतिशय चतूर असून ती दोन, चार, पांच हजारांतच गंडवते, मोठी रक्कम नसते यामुळे कुणी एफआयआर दाखल करीत नाहीत, यामुळे या महिलेची चर्चा होत नाही, त्यामुळे तिचे हे उद्योग बिनबोभाट सुरू आहेत. तिचे फेसबुक प्रोफाइल चेक केल्यावर कासोदा गावातून सुमारे १५ तरुण तिचे फ्रेंड आहेत, ती जळगावात रहात असून, तिच्या घरच्यांनी तिच्याशी संपर्क तोडल्याची माहिती मिळाली आहे.
तिचा या उद्योगामुळे तिच्या घरच्यांनी तिच्याशी कोणताही संबंध ठेवला नसल्याची माहिती उमेश नवाल यांनी दिली. तिच्या फ्रेंड लिस्टमध्ये एकाच कम्युनिटीचे सर्व फ्रेंड दिसत आहेत, ती मयुरी मालू असून, मणियार कशी झाली, याबाबत समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीशी चर्चा करीत असल्याचेदेखील सांगितले आहे.
ती तिच्या बँक खात्यातही रक्कम ट्रान्स्फर करीत नसून, दुसऱ्याच्या अकाउंटला पैसे पाठवायला सांगते, त्यामुळे हे मोठेच रॅकेट आपल्या जिल्ह्यात या धंद्यात कार्यरत असावे, अशी चर्चा होत आहे.