शिंदखेडय़ातून चोरलेल्या सहा दुचाकी जप्त

By Admin | Updated: April 15, 2017 00:24 IST2017-04-15T00:24:34+5:302017-04-15T00:24:34+5:30

अमळनेर : संशयित अल्पवयीन मुलगा ताब्यात

Six-wheelers stolen from Shindkhede seized | शिंदखेडय़ातून चोरलेल्या सहा दुचाकी जप्त

शिंदखेडय़ातून चोरलेल्या सहा दुचाकी जप्त

अमळनेर : एका अल्पवयीन मुलाकडून  चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व दुचाकी शिंदखेडा येथून चोरलेल्या असून, त्याची किंमत चार लाख रुपये आहे.
शिंदखेडा (ता.धुळे) येथील एक 17 वर्षीय मुलगा शहरातील शिरुड नाका भागात कॉलेजचा विद्यार्थी म्हणून भाडय़ाच्या खोलीत राहत असून तो दुचाकी चोरतो, अशी गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी त्या अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन 13 रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने शिंदखेडा येथून दुचाकी चोरून आणल्या असल्याची कबुली दिली. त्या सर्व दुचाकी तो राहत असलेल्या भाडय़ाच्या खोलीच्या भिंतीलगत दडवून ठेवल्या होत्या. तर काही दुचाकी या शहरातील केलेनगर भागातील मोकळ्या बखळ जागेतील काटेरी झुडपात लपवून ठेवलेल्या होत्या. गुन्हे शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, चंद्रकांत गोसावी, पोलीस नाईक विजय साळुंखे, जनार्दन पाटील, विशाल चव्हाण यांनी या दुचाकींचा पंचनामा करून त्या ताब्यात घेतल्या आहेत. या सर्व दुचाकींची किंमत चार लाख रुपये आहे. यातील काही दुचाकींच्या नंबर प्लेट बदलविण्यात आलेल्या आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास वाघ व त्यांच्या पथकाने केली आहे. संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, हा गुन्हा व जप्त केलेल्या दुचाकी शिंदखेडा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहेत. तर अल्पवयीन आरोपीची धुळे येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात येणार आहे.                       (वार्ताहर)

Web Title: Six-wheelers stolen from Shindkhede seized