सावखेड्याजवळ पकडला सहा लाखांचा गांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:31+5:302021-07-14T04:20:31+5:30
अमळनेर : धरणगावकडून सावखेड्याकडे जाणाऱ्या कारमधून सुमारे सहा लाख रुपये किमतीचा ४० किलो गांजा वाहून नेणाऱ्या कासोदा येथील ...

सावखेड्याजवळ पकडला सहा लाखांचा गांजा
अमळनेर : धरणगावकडून सावखेड्याकडे जाणाऱ्या कारमधून सुमारे सहा लाख रुपये किमतीचा ४० किलो गांजा वाहून नेणाऱ्या कासोदा येथील पंचायत समिती सदस्याच्या पतीसह एरंडोल येथील तिघांना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गांजा, मोटरसायकल व कार असा साडेदहा लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना चार दिवसांची कोठडी मिळाली आहे.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, एपीआय राकेश परदेशी, हेकॉ किशोर पाटील, मिलिंद भामरे व हेडकॉन्स्टेबल मधुकर पाटील यांनी १२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सावखेडा शिवारात चोपडा- धरणगाव रस्त्यावर हॉटेल इंद्रायणीजवळ पेट्रोलिंग करीत असताना ही कारवाई केली. त्यांनी मोटरसायकलवर (एमएच १९/ बीसी ५७३०) येणाऱ्या इसमाच्या संशयित हालचालींवरून ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याचे नाव सतीश बापू चौधरी असे त्याने सांगितले. त्याचा मोबाईल जप्त केला असता थोड्या वेळाने पावणेअकरा वाजता मागून कार (एम एच ०१/ बीटी ५०९ )येताना दिसली. त्याची तपासणी केली असता त्यात ३९ किलो ५०० ग्रॅम असा २० पाकिटे गांजा डिक्कीत आढळून आला. गाडी चालक आकाश रमेश इंगळे रा. मरीमाता नगर, एरंडोल व त्याच्या सोबत कासोदा येथील इस्लामपुरा भागातील शकिल खान अय्युब खान यांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक हिरे यांनी तत्काळ डीवायएसपी राकेश जाधव व तहसीलदार मिलिंद वाघ यांच्याशी संपर्क साधून शासकीय पंच मागवून पंचनामा केला. गांजाची किंमत ६ लाख असून ,४ लाखांची चारचाकी व ५० हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिलिंद भामरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्या. अग्रवाल यांनी तिन्ही आरोपींना १७ पर्यंत कोठडी सुनावली. दरम्यान, शकिल खान अय्युब खान हे कसोद्याच्या पंचायत समिती सदस्यांचे पती असून त्या सदस्या आघाडी सरकारच्या पक्षामधील असल्याचे समजते. गेल्या वर्षभरापूर्वी देखील धरणगावहून गांजा आणताना दोघांना अटक केली होती त्यात मुख्य आरोपी कसोद्याचा असल्याचे उघडकीस येऊनही तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी पुढील तपास केला नव्हता. त्यामुळे मूळ आरोपी पकडला नव्हता. काही पोलिसांनी यात चिरीमिरी केल्याची चर्चा होती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी देखील केली आहे.
फोटो क्रमांक १४ व्हिडीटी ०८)
आरोप तसेच जप्त केलेल्या मालासोबत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व कर्मचारी (अंबिका फोटो)