साहेब, दुसरी लाटही गेली, कोरोना काळातील भत्ता केव्हा मिळेल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST2021-09-16T04:21:28+5:302021-09-16T04:21:28+5:30
जळगाव : गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत जीव धोक्यात घालून काम केल्यानंतरही महामंडळातर्फे अद्यापही काही कर्मचाऱ्यांना कोरोना ...

साहेब, दुसरी लाटही गेली, कोरोना काळातील भत्ता केव्हा मिळेल?
जळगाव : गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत जीव धोक्यात घालून काम केल्यानंतरही महामंडळातर्फे अद्यापही काही कर्मचाऱ्यांना कोरोना काळात काम केल्याचा भत्ता देण्यात आलेला नाही. महामंडळाच्या जळगाव विभागात भत्त्यापासून वंचित असलेले अनेक कर्मचारी असून, भत्ता मिळण्याच्या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे फिरफिर करावी लागत आहे.
गेल्या वर्षी महामंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, कोरोना काळात परप्रांतीय बांधवांना त्यांच्या सीमेलगत भागातील गावांमध्ये सोडण्यासाठी महामंडळातर्फे अत्यावश्यक बस सेवा सुरू ठेवण्यात आली होती. या अत्यावश्यक कोरोना काळात सेवा बजावण्यासाठी महामंडळाच्या चालक-वाहकांसह जे कर्मचारी सेवा बजावण्यासाठी येतील, अशा कर्मचाऱ्यांना महामंडळातर्फे दर दिवसाला ३०० रुपये जादा भत्ता देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत जीव धोक्यात घालून काम केले. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना दीड वर्षांनंतरही हा भत्ता मिळालेला नाही.
इन्फो :
भत्ता मिळण्यासाठी दररोज अधिकाऱ्यांकडे चकरा
गेल्या वर्षी मार्च ते मे दरम्यान कोरोनाच्या कठीण काळात या कर्मचाऱ्यांनी काम केले. यावेळी महामंडळातर्फे या कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या पगारात हा भत्ता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, भत्ता तर सोडा या कर्मचाऱ्यांना त्यावेळी पगारही वेळेवर देण्यात आला नाही. त्यामुळे पगारासाठी या कर्मचाऱ्यांना अनेकवेळा आंदोलने करावी लागली. तसेच पगारासाठी गेल्या वर्षी जळगावात एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या सर्व प्रकारानंतर महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांची देणी, तत्काळ देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, अद्यापही या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त वैद्यकीय बिले, कोरोना काळातील भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध आगारातील कर्मचारी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, हा भत्ता मिळण्याच्या मागणीसाठी चकरा मारताना दिसून येत आहेत.
इन्फो :
कोरोना काळातील अत्यावश्यक सेवेत ज्या कर्मचाऱ्यांनी काम केले होते. त्या सर्वांना हा भत्ता देण्यात आलेला आहे. या भत्त्याबाबत आता महामंडळाकडे कुठल्याही कर्मचाऱ्याचे घेेणे नाही.
भगवान जगनोर, विभाग नियंत्रक,जळगाव विभाग
इन्फो :
कोरोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त ३०० रूपये देण्यात येणारा भत्ता, दीड वर्ष उलटूनही काही कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. तो भत्ता कर्मचाऱ्यांना देण्याच्या मागणीसाठी इंटक संघटनेतर्फे शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
भगतसिंग पाटील, जिल्हाध्यक्ष, इंटक संघटना