तरूणांचा प्रामाणिकपणा, महिलेला बॅग केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:48+5:302021-09-23T04:19:48+5:30
जळगाव : आताच्या युगात पैसा हेच मानवाचे सर्वस्व होऊन बसले आहे. पण, अशाही काळात क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी ...

तरूणांचा प्रामाणिकपणा, महिलेला बॅग केली परत
जळगाव : आताच्या युगात पैसा हेच मानवाचे सर्वस्व होऊन बसले आहे. पण, अशाही काळात क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी व अविनाश पारधे या दोन तरुणांनी रस्त्यात सापडलेली पैसे व दागिने असलेली बॅग महिलेला परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडवून आणले आहे.
क्षितिज फांउडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी व अविनाश पारधे घरी जात असताना सिंधी कॉलनी येथील सेवा मंडळाजवळ त्यांना रस्त्यावर एक बॅग दिसून आली. ती बॅग हाती घेतल्यानंतर त्यात दहा ते अकरा हजार रुपयांची रक्कम तसेच सोन्याचे दागिने, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईलदेखील आढळून आला. वंजारी व पारधे यांनी ज्या व्यक्तीची बॅग आहे, त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. संपर्क झाल्यानंतर ती बॅग सिंधी कॉलनीतील रहिवासी कृष्णा मेहता यांची असून त्या अग्रवाल हॉस्पिटल येथे कामाला असल्याचे समोर आले. वंजारी व पारधे यांनी लागलीच हॉस्पिटल गाठून मेहता यांना त्यांची बॅग परत केली. दोन्ही तरुणांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.