गतवर्षीच्या लॉकडाऊन व सीएमव्हीमुळे घटत्या संतुलित केळी उत्पादनाच्या भावात चांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:31+5:302021-06-16T04:23:31+5:30
रावेर : गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दोन-तीन महिने केळीच्या उतीसंवर्धित रोपनिर्मिती करणार्या वातानुकूलित प्रयोगशाळा बंद राहिल्याने व रोपे उपलब्धतेनुसार पर्यायाने ...

गतवर्षीच्या लॉकडाऊन व सीएमव्हीमुळे घटत्या संतुलित केळी उत्पादनाच्या भावात चांदी
रावेर : गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दोन-तीन महिने केळीच्या उतीसंवर्धित रोपनिर्मिती करणार्या वातानुकूलित प्रयोगशाळा बंद राहिल्याने व रोपे उपलब्धतेनुसार पर्यायाने टप्प्या-टप्प्याने केळी लागवड उशिरा झाली. त्यातच उशिरा लागवड झालेल्या केळीबागा कुक्कूंबर मोझॅक व्हायरसने उखडून फेकाव्या लागल्याने केळी लागवडीचे चक्र उशिरापर्यंत टप्प्या-टप्प्यात सुरू राहिले होते. त्याची फलश्रुती म्हणून यंदा मार्च महिन्यापासून ते आजपावेतो व पुढेही उशिराने संतुलित पध्दतीने कापणीवर येणाऱ्या केळीबागांमधील मालाच्या भावाची चांदी प्रतिक्विंटल हजार ते पंधराशे रुपये राहणार असल्याची स्थिती केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुखेनैव ठरली आहे.
दरवर्षी केळी लागवड मे, जून, जुलै महिन्यात एकाचवेळी होऊन केळी उत्पादनाची कापणीही एकाचवेळी सुरू होत असल्याने केळी मालाची उपलब्धता एकाचवेळी होत असते. परिणामी, केळी मालाची आवक वाढून मागणीत घसरण, म्हणजे केळीचे बाजारभाव गडगडत असल्याची विदारक स्थिती दरवर्षी पाहायला व अनुभवायला मिळते.
गतवर्षी मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उतीसंवर्धित केळी रोपांची निर्मिती करणाऱ्या वातानुकूलित प्रयोगशाळा बंद राहिल्याने टिश्युकल्चर केळी रोपांची उपलब्धता कमालीच्या विलंबाने व टप्प्या-टप्प्याने होत राहिल्याने केळी लागवड गतवर्षी उशिरापर्यंत सुरू राहिली. किंबहुना, नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने... याप्रमाणे कुक्कूंबर मोझॅक व्हायरसने डोके वर काढल्याने हजारो हेक्टरमधील लागवडीखालील केळीबागा जळामुळांसकट उपटून फेकण्याचे संकट ओढवले. त्या रोगग्रस्त बागांवर पुनर्लागवड उशिरापर्यंत सुरूच राहिल्याने गतवर्षी केळी लागवडीचे चक्र अनायासास मार्चपासून ते थेट सप्टेंबर व ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरूच होते.
परिणामी रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा तालुक्यात एकाचवेळी होणाऱ्या केळी लागवडीचा फटका एकाचवेळी कापणीवर येणाऱ्या केळीमालाच्या उत्पादनाला न बसता, लॉकडाऊन व कुक्कूंबर मोझॅक व्हायरसच्या तांत्रिक कारणांमुळे मार्च महिन्यापासून ते आजपावेतो केळी भाव स्थिर असून थेट ऑक्टोबर वा नोव्हेंबर महिन्यापर्यंत निघणाऱ्या नवती केळीच्या मालाला किमान १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल किंबहुना त्यापेक्षा जास्त भावाने केळीच्या बाजारभावात चांदी राहण्याची शक्यता जाणकार शेतकर्यांमधून वर्तवली जात आहे.
यंदा एक लाख मेट्रिक टन केळी निर्यातीची उद्दिष्टपूर्ती होणार
फेब्रुवारीपासून ते मे महिन्यापर्यंत रावेर व यावल तालुक्यातून पूर्वमध्य आखाती राष्ट्रांत सुमारे तीन हजार कंटेनरमधून ६० हजार मेट्रिक टन केळीची निर्यात झाली आहे. किंबहुना, गतवर्षी लॉकडाऊन व सीएमव्हीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या चक्राकार केळी लागवडीतून केळी उत्पादनाची आवकही चक्राकार पध्दतीने लांबणार असल्याने थंडीच्या चिलिंग एन्ज्युरीनंतर नोव्हेंबरनंतर सुरू होणार्या केळी निर्यातीच्या व्यवसायाला यंदा जुलैअखेर वा ऑगस्टपासूनच केळी निर्यातीची संधी उपलब्ध होणार असल्याचा आत्मविश्वास केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. किंबहुना, यंदा १ लाख मेट्रिक टन केळी आखाती राष्ट्रांत निर्यात करण्याची उद्दिष्टपूर्ती होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.