जळगावात दहशतवादाच्या निषेधार्थ मूक रॅली
By Admin | Updated: May 21, 2017 13:35 IST2017-05-21T13:35:01+5:302017-05-21T13:35:01+5:30
जळगावकरांनी केला दहशतवाद संपविण्याचा निर्धार. भव्य रॅलीने घडविले एकता व देशभक्तीचे दर्शन

जळगावात दहशतवादाच्या निषेधार्थ मूक रॅली
जळगाव,दि.21- दहशतवाद ही एक कीड असून ती मुळासकट नष्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचा संदेश देत हजारो जळगावकर नागरिक रविवारी सकाळी शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरले. कोणतीही घोषणाबाजी न करता दहशतवादाचे भूत संपविण्याचा निर्धार ‘दहशतवादी विरोधी दिना’निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीतून व्यक्त करण्यात आला.
स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ तसेच युवाशक्ती फाउंडेशन यांच्यावतीने रविवारी काढलेल्या सर्वधर्मीय दहशतवादविरोधी रॅलीत जळगावकर नागरिक व विविध संघटना स्वयंस्फूर्तीने मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या.
शनिपेठेतून सुरू झालेली रॅली शास्त्री टॉवर चौक, नेहरू चौक मार्गे खान्देश सेंट्रल परिसरात पोहचली. त्याठिकाणी कन्यारत्न सर्कल नजीक रॅलीचे सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी दहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक कैलास सोनवणे, युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललीत कोल्हे, स्थायी समिती सभापती वर्षा खडके, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीपक घाणेकर, अनिल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी उपमहापौर करीम सालार, डॉ. संजय शेखावत, जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके, सिद्धांत बाफना, मनोहर पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.