शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या विद्युत खांब हटविण्याच्या कामाचा ‘श्रीगणेशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:22+5:302021-09-23T04:19:22+5:30

शिवाजी पुलापासून टॉवरपर्यंत अंडरग्राऊंड हायटेन्शन लाईन : मुखर्जी उद्यानात बसविणार ट्रान्सफाॅर्मर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामातील ...

‘Shriganesha’ of removal of power poles of Shivajinagar flyover | शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या विद्युत खांब हटविण्याच्या कामाचा ‘श्रीगणेशा’

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या विद्युत खांब हटविण्याच्या कामाचा ‘श्रीगणेशा’

शिवाजी पुलापासून टॉवरपर्यंत अंडरग्राऊंड हायटेन्शन लाईन : मुखर्जी उद्यानात बसविणार ट्रान्सफाॅर्मर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामातील प्रमुख अडथळा ठरलेल्या विद्युत खांबाच्या स्थलांतराच्या कामाला बुधवारपासून अखेर सुरुवात झाली आहे. या कामांतर्गत शिवाजीनगर उड्डाण पुलापासून ते टॉवरपर्यंतच्या रस्त्यात एकही विद्युत खांब उभारला जाणार नसून उच्च दाबाची विद्युत लाईन ही अंडरग्राऊंड टाकली जाणार आहे. तसेच ग्राहकांना कनेक्शनसाठी ठिकठिकाणी फिडर पिलर उभारले जाणार आहेत. हे काम १५ ते २० दिवसांत पूर्ण करण्यावर महावितरणचा भर असून, हे काम झाल्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला २५ फेब्रुवारी २०१९ पासून सुरुवात झाली होती. हे काम १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अडीच वर्षे होऊनदेखील या पुलाचे काम अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकलेले नाही. या पुलाचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, पुलाच्या कामाला मुख्य अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब स्थलांतराचे काम तब्बल वर्षभर रखडल्याने या पुलाचे काम मुदतीत होऊ शकलेले नाही. ‘लोकमत’ने सातत्याने या प्रश्नाकडे प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून अखेर या विद्युत खांब हटविण्याचा कामाला मनपाकडून निधी वर्ग करून, कामाला सुरुवात झाली आहे.

मनपाने करून दिली जागा निश्चित

अनेकदा महावितरणकडून कामे करताना त्याची स्थानिक स्वराज्य संस्थेला माहिती दिली जात नाही. त्यामुळे भविष्यात जागेच्या विस्ताराचा विषय येताच अडचणी समोर दिसतात. त्यामुळे आगामी काळातील समस्या टाळण्यासाठी महावितरणने खांब शिफ्टिंगचे काम करण्यापूर्वी स्थळ निश्चिती करावी असे पत्र दिले होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ट्रान्सफाॅर्मर बसविण्यासाठी श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाचे स्थळ निश्चित करून दिले आहे. यासह शारदा बुक डेपो व शहर पोलीस ठाण्याजवळदेखील ट्रान्सफाॅर्मर बसविण्यात येणार आहे.

मार्चपर्यंत पूल होणार वाहतुकीसाठी खुला

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम हे विद्युत खांब स्थलांतराच्या कामामुळे रखडले होते. आता हे काम महावितरणकडून १५ ते २० दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यास पुलाच्या उर्वरित कामाला सुरुवात होऊ शकते. तीन महिन्यांत पूर्ण होऊन मार्च महिन्यात शिवाजीनगर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

Web Title: ‘Shriganesha’ of removal of power poles of Shivajinagar flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.