‘मधुकर'च्या हितासाठी 'श्रद्धा - सबुरी' हाच उपाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:49+5:302021-09-24T04:19:49+5:30
फैजपूर : येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याने गेल्या ४२ वर्षांत ऊस उत्पादक, कामगार व त्यावर अवलंबून सर्वच घटकांचे हित ...

‘मधुकर'च्या हितासाठी 'श्रद्धा - सबुरी' हाच उपाय!
फैजपूर : येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याने गेल्या ४२ वर्षांत ऊस उत्पादक, कामगार व त्यावर अवलंबून सर्वच घटकांचे हित जोपासले. मात्र, गेल्या दोन वर्षांत कारखाना अडचणीत सापडला असून, बंद अवस्थेत आहे. आता मधुकरलाच सहकार्याची गरज आहे. आता या सर्व घटकांनी संयम दाखवत मदत केल्यास कारखाना व आसवानी प्रकल्प भाडेतत्त्वावर देऊन पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतात, अशी भावनिक साद ४७ व्या वार्षिक सभेत चेअरमन शरद महाजन व संचालक नरेंद्र नारखेडे यांनी सर्वांना घातली.
कारखाना सभागृहात गुरुवारी कारखान्याच्या ४७ व्या ऑनलाईन वार्षिक सभेचे आयोजन चेअरमन शरद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. माजी आमदार अरुण पाटील, रमेश चौधरी, उपाध्यक्ष भागवत पाटील, जि. प. सदस्य प्रभाकर सोनवणे, जिल्हा बँक संचालक गणेश नेहते, कामगार संघटनेचे अध्यक्ष किरण चौधरी व सर्व संचालक यांची उपस्थिती होती.
विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक शंकर पिसाळ यांनी केले, तर मागील सभेचे इतिवृत्त वाचन रत्नदीप वायकोळे यांनी केले
कारखाना हितासाठी सदैव सोबत - शिरीष चौधरी
आमदार शिरीष चौधरी यांनी या वार्षिक सभेला मुंबई येथून ऑनलाईन उपस्थिती नोंदवत कारखाना सुरू करण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी सदैव सोबत असल्याची ग्वाही दिली. तसेच साखर साठा विक्रीतून जी रक्कम जमा झाली आहे, त्यातून शेतकरी तसेच कामगार व व्यापारी यांची देणी देण्यासाठी प्राधान्य द्यावे. कारखाना भाडेतत्त्वावर देताना सर्वांना विश्वासात घ्यावे, अशी सूचनाही केली.
कारखाना भाडेतत्त्वावरचा प्रस्ताव सादर
साखर कारखान्याने गेल्या ४७ वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, नैसर्गिक संकट, दुष्काळ, ऊस उत्पादन कमी व अन्य बाबींमुळे कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. कारखान्याचा तोटा १०९ कोटींपर्यंत गेला आहे, तर साखर विक्रीतून २९ कोटी ६९ लाखांची रक्कम न्यायालयात जमा झाली आहे. त्यातून न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. तसेच कारखाना व आसवानी प्रकल्प १५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे योग्य ती कार्यवाही करून सादर करण्यात आला आहे. त्यासाठी योग्य प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भाडेतत्त्वाच्या निर्णयाची मुहूर्तमेढ रोवली जाईल. भाडेतत्त्वाचा निर्णय सर्वांच्या सहकार्याने सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे शरद महाजन यांनी सांगितले.
‘मधुकर’च्या हितासाठी संयम एकमेव उपाय !
कारखान्याचे संचालक नरेंद्र नारखेडे म्हणाले, दोन वर्षांत अडकलेली सर्वांची देणी देण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे. त्यासाठी भाडेतत्त्वाचा निर्णय अंतिम सत्य आहे. त्यानंतरच हे शक्य होणार आहे. तर संचालक मंडळाची ही अंतिम वार्षिक सभा असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी माजी आमदार अरुण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.