थोडक्यात बातम्या ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:31+5:302021-06-21T04:13:31+5:30

जळगाव : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेचे आयोजन २५ रोजी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात ...

Short news ... | थोडक्यात बातम्या ...

थोडक्यात बातम्या ...

जळगाव : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेचे आयोजन २५ रोजी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. या सभेत १२ विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आले असून, आयत्या वेळच्या विषयांवर या सभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. तसेच महाबळ परिसरात निर्माण झालेल्या पाण्याचा समस्येवरूनदेखील या सभेत मनपा प्रशासनाला धारेवर धरले जाणार आहे.

पेरण्या लांबण्याची भपती

जळगाव : जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरण्यांना सुरुवात केली आहे. तर चोपडा, धरणगाव तालुक्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याने या भागात अद्याप शेतकऱ्यांकडून शेत तयार करण्याचे काम सुरु असून, शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पाऊस लांबत असल्याने जिल्ह्यात जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत पेरण्या होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार निधीतून पाण्याची व्यवस्था

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील ख्रिस्ती कब्रस्थान येथे पिण्याचा पाण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार समाजबांधवांकडून अनेकवेळा नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यकडे करण्यात आली होती. याबाबत आमदार सुरेश भोळे यांच्याकडे दारकुंडे यांनी तक्रार केल्यानंतर या भागात आमदार सुरेश भोळे यांच्या निधीतून रविवारी ट्यूबवेल बसविण्याझचक कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे समाजबांधवांच्या पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे.

शिवसेनेकडून योग स्पर्धा

जळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिवसेना महानगरच्यावतीने ऑनलाईन योग स्पर्धेचे आयोजन २१ जून रोजी करण्यात आले आहे. ५ ते १६ वयोगटातील मुला-मुलींनी आपला १ मिनिटाचा योग करतानाचा व्हिडिओ युवाशक्तीचे अध्यक्ष विराज कावडिया यांना २१ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना शिवसेनेकडून आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

पावसाळ्यातही बायपासचे काम जोरात

जळगाव : शहराबाहेरून आव्हाणे शिवारातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासच्या कामाला गेल्या काही महिन्यांपासून वेग आला आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरु झाला असला तरी पावसाळ्यातही बायपासचे काम सुरु असून, पाळधी शिवार, भोकणी, आव्हाणे ते ममुराबाद शिवारपर्यंत या महामार्गाच्या बायपासला कच्चा भराव टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, काही भागात खडीने भराव टाकण्याचे काम सुरु आहे.

चिंचपाणी, निंबादेवी डॅमवर गर्दी

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने वन विभागाकडून सातपुड्यातील जवळपास सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केले आहेत. सातपुडा परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चिंचपाणी, निंबादेवी डॅम, वाघझिरा या ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. शनिवारी व रविवारी या ठिकाणांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.

कानळदा रस्त्यालगत चिखलाचे साम्राज्य

जळगाव : शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, मनपा प्रशासनाने पावसाळ्याआधी ऱस्त्याच्या दुरुस्तीचे काम अपूर्णावस्थेत सोडल्याने पावसानंतर वाहनधारकांचे चांगलेच हाल होत आहेत. कानळदा रस्त्यालगत अमृत अंतर्गत खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने या रस्त्यालगत पावसामुळे सर्वदूर चिखल झाला आहे. यामुळे वाहनधारकांना या ऱस्त्यावरून वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत असून, अनेक वाहनधारक या चिखलावरून घसरून पडतदेखील आहेत. या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Short news ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.