शनिवारीही दुकाने सुरू, पोलीस व पालिकेचा दहा दुकानांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:27+5:302021-07-18T04:13:27+5:30
पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, सुनील पाटील, अतिक्रमण विभागाचे राध्यश्याम अग्रवाल, यश लोहरे, विकास बिऱ्हाडे, विशाल सपकाळे, जितू चावरीया, ...

शनिवारीही दुकाने सुरू, पोलीस व पालिकेचा दहा दुकानांना दंड
पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, सुनील पाटील, अतिक्रमण विभागाचे राध्यश्याम अग्रवाल, यश लोहरे, विकास बिऱ्हाडे, विशाल सपकाळे, जितू चावरीया, जगदीश बिऱ्हाडे, अविनाश बिऱ्हाडे, यश चव्हाण आदींनी शनिवारी बाजारपेठेत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर उघड्या असणाऱ्या नईम पठाण, श्री लक्ष्मी नारायण, राज इलेक्ट्रिकल, ए. आर. शॉपिंग, अलमदार स्टोअर्स, उज्ज्वल कलेक्शन, एपो मोबाइल, न्यू ओम कलेक्शन, समर्थ बॅटरी, साई सिलेक्शन या दुकानांना दंड केला आहे. शारदा जनरल स्टोअर्स व मनोज गिफ्ट या दुकानांनाही दंड करण्यात आला.
शनिवार व रविवारी भाजीपाला, फळे यांचीही दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. मात्र भाजीपाला आणि फळविक्रेते तसेच काही चप्पल विक्रेते, गॅरेज चालक, हॉटेलचालक, कापड विक्रेते, पान टपऱ्या, बांधकाम साहित्य विक्रेते दुपारी ४नंतर आणि शनिवार व रविवारीदेखील आपली दुकाने सुरू ठेवत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली म्हणून नागरिकदेखील बेफिकीर झाले आहेत.
विनामास्क आणि सॅनिटायझरचा वापरही कमी झाला आहे. पालिकेच्या पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र मोजके कर्मचारी असल्याने संपूर्ण शहरासाठी ते अपूर्ण पडतात. काही दुकानदार किरकोळ दंड भरून पुन्हा आपला व्यवसाय नियमबाह्य सुरूच ठेवतात. पथक गेल्यावर पुन्हा दुकाने अर्धे शटर लावून ग्राहक आत घेत असतात.
एकूण साडेआठ लाख रुपये दंड वसूल
कोरोनाच्या काळात वेळोवेळी जिल्हाधिकारी व शासनाच्या आदेशानुसार नियमांचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालये, विनामास्क, फिजिकल डिस्टन्स न पाळणे, बेकायदा गर्दी जमविणे याबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, पोलिसांच्या मदतीने नगरपालिकेने सुमारे साडेआठ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण नसले तरी पावसाळा सुरू झाला असून, विविध संसर्ग आजारांची लागण झाल्यास कोविड व इतर विषाणू यांचा संसर्ग लवकर होऊ शकतो त्यामुळे बालकांच्या सुरक्षेसाठी दुकानदारांनी नियमांचे पालन करावे.
-पुष्पलता पाटील, नगराध्यक्ष, अमळनेर नगरपालिका