मुक्ताईनगर : बोगस कीटकनाशकाच्या फवारणीमुळे पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकान व शेतीची पाहणी करून तपासणी केली.
कीटकनाशकांच्या नावावर मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथील विजय कुलकर्णी या शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. मुक्ताईनगरातील सागर सीड्स या कृषी दुकानातून बायो ३०३ कंपनी दमणचे हे कीटकनाशक घेतले होते. मिरची पिकावर फवारणी केली असता लाखो रुपयांच्या मिरचीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पंचायत समितीचे कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संबंधित दुकानदाराची तक्रार केली होती. कृषी अधिकारी त्या कीटकनाशकाच्या बाटलीचे नमुने घेण्यासाठी त्या दुकानात गेले असता दुकानात ते कीटकनाशक शिल्लक नसल्याचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी सांगितले.
शेतकऱ्याला दिलेल्या बिलावर लाॅट नंबर नसल्याने तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी त्या दुकानदाराला नोटीस बजावली.
याप्रकरणी तपासणीसाठी जळगाव येथील कृषी विभागाचे गुणनियंत्रण अधिकारी अरुण तायडे व तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी २० रोजी नुकसानग्रस्त मिरची पिकाची पाहणी केली तसेच मुक्ताईनगरातील सागर सीड्स या कृषी दुकानात जात येथे पाहणी केली. नुकसानीचे मिरचीचे दोन रोपे अधिकाऱ्यांनी घेतले. तपासणीसाठी ममुराबाद येथील कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांकडे पाठविले असल्याचे तालुका कृषी अधिकारी माळी यांनी सांगितले.