धक्कादायक! ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्कचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:16 IST2021-03-26T04:16:14+5:302021-03-26T04:16:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पहाटेच्या वेळी होणाऱ्या भाजीपाला व फळांच्या लिलावावेळी दररोज शेकडोंच्या ...

धक्कादायक! ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्कचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पहाटेच्या वेळी होणाऱ्या भाजीपाला व फळांच्या लिलावावेळी दररोज शेकडोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. अक्षरश: या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. गंभीर म्हणजे, ५० टक्के नागरिक तेथे विना मास्क आढळून आल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारीच नाही तर शेतकरी आणि ग्राहकांनादेखील फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण अशा खबरदारीच्या उपाययोजनांचे गांभीर्य नसल्याने कोरोनाला खुलेआम निमंत्रण मिळत आहे. या ठिकाणी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील व्यापारी व शेतकरी शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी येत असतात. अशा परिस्थितीत एखादा कोरोनाबाधित व्यक्ती त्या ठिकाणी दाखल झालेला असेल तर एकाच वेळी शेकडो जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, शेतकरी, व्यापारी जळगावातून कोरोनाचा प्रसार बाहेरदेखील करू शकतात. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनासह महापालिकेने धडक कारवाई करण्याची गरज आहे.
कोरोनाचा उद्रेक, पण गांभीर्य नाही..
जळगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित फळे व भाजीपाला मार्केट आहे. या ठिकाणी दररोज पहाटे ५ वाजेपासून शेतमालाचा जाहीर लिलाव केला जातो. या मार्केटमध्ये सुमारे दीडशेहून अधिक नोंदणीकृत व्यापारी आणि आडते आहेत. जळगावसह राज्यातील इतर जिल्हे आणि परराज्यातून या ठिकाणी फळे तसेच भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत लिलाव सुरू असतो. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मार्केटमध्ये दररोज शेतकरी, व्यापारी, आडते तसेच माल घेणारे किरकोळ विक्रेते यांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते. अनेक व्यापारी तसेच ग्राहक तोंडावर मास्कदेखील बांधत नाहीत. मालाचा लिलाव करताना व्यापारी आणि शेतकरी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत नाहीत.
सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता
जिल्ह्यात दररोज हजाराच्या संख्येने बाधित आढळून येत आहेत. त्यात शहरातसुद्धा मोठ्या प्रमाणावर बाधित आहेत. त्यामुळे सर्वात धोक्याची बाब म्हणजे, या ठिकाणी जर कुणी कोरोनाबाधित व्यक्ती असली तर त्यामुळे संसर्ग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय येथून फळे आणि भाजीपाला घराघरात जातो. अशाने कोरोनाचा फैलाव रोखणे कठीण होऊ शकते.
लोकमत प्रतिनिधीला काय आढळले.
१) बाजारात येणारे व्यापारी, आडते, शेतकरी तसेच किरकोळ विक्रेत्यांसाठी प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था प्रवेशद्वाराजवळ कुठलेही दिसून आली नाही.
२) बाजार समितीत येत असलेल्या व्यक्तीने मास्कसुद्धा घातलेला आहे की नाही, हे सुद्धा तपासले जात नव्हते. दरम्यान, शेतीमाल हा नाशवंत असल्याने, शिवाय हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल पाहता बाजार समिती जास्त दिवस बंद ठेवणे शक्य नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल व कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न होईल. त्याप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.