धक्कादायक...मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:15+5:302021-03-04T04:28:15+5:30

जळगाव : गणेश कॉलनीतील शासकीय आशादीप महिला वसतीगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य ...

Shocking ... made the girls take off their clothes and dance | धक्कादायक...मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावले

धक्कादायक...मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावले

जळगाव : गणेश कॉलनीतील शासकीय आशादीप महिला वसतीगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यांच्यावर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्यांच्याकडूनच महिला सुरक्षेला छेद देण्याचा प्रकार घडला. सामाजिक संघटनांनी मंगळवारी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यात मुलींनी कथन केलेल्या प्रकाराचा व्हिडीओच सादर केला.

महिला व बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीत आशादीप वसतीगृह चालविले जात असून तेथे निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींना निवारा व भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतीगृहात गेल्या काही दिवसापासून गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी वाढल्याने जननायक फांऊडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे, प्रतिभा भालेराव, साहिल पठाण, वर्षा लोहार व फारुख कादरी यांनी मंगळवारी दुपारी वसतीगृह गाठून महिला व मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी व बाहेरील पुरुष अशांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले. काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बाहेरील लोकांना व पोलिसांना चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असून यात गैरव्यवहारही होत असल्याची कैफियत काही मुलींनी मांडली. ज्या मुली चुकीच्या कामांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते. सामाजिक कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, परंतु मुली बाहेरुनच खिडकीतून आपल्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करीत होत्या, परंतु त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता.

दरम्यान, येथील व्हिडीओचे पुरावे घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. याची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन राऊत यांनी दिल्याची माहिती फिरोज पिंजारी यांनी दिली.

कोट...

संस्थेत चुकीचा व गैरप्रकार अजिबात होत नाही. न्यायालय व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानेच येथे मुली व महिलांना पाठविले जाते. येथे त्यांना सुरक्षा पुरविली जाते. व्हिडीओत जी मुलगी बोलते आहे, तिची मानसिक स्थिती ठीक नाही. गरोदर मुलींना तिने मारहाणही केली आहे. आजच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मुलींना निरीक्षणगृहात पाठविले. तक्रार करणाऱ्यांना यापूर्वी आम्ही प्रवेश दिला नव्हता, म्हणून हे षडयंत्र घडवून आणण्यात आले आहे.

-रंजना झोपे, परिविक्षाधीन महिला अधिकारी

Web Title: Shocking ... made the girls take off their clothes and dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.