कोरोनामुळे बंद मंदिरांना वीज बिलाचा शाॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:56+5:302021-09-05T04:20:56+5:30
आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना काळात देऊळ बंद करण्यात आले आहे. तरीही तेथे पुजारी नित्यनेमाने पुजा ...

कोरोनामुळे बंद मंदिरांना वीज बिलाचा शाॅक
आकाश नेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना काळात देऊळ बंद करण्यात आले आहे. तरीही तेथे पुजारी नित्यनेमाने पुजा अर्चा करत आहेत. त्यासोबतच विविध सण देखील मंदिरांमध्ये भाविकांच्या अनुपस्थितीतच साजरे केले जात आहेत. मंदिरात देणगी रुपयांत आणि अन्य खर्च हजारात होत असल्याने व्यवस्थापनाची तारेवरची कसरत होत आहे. त्यातच प्रत्येक महिन्याचे वीज बिल कायम असल्याने कोरोनामुळे मंदिर बंद पण वीज बिलांचा शाॅक अशी स्थिती आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे लॉकडाऊन लावण्यात आला. त्यात पहिला फटका बसला तो देवस्थांनांना. मंदीर, मशिद, चर्च, गुरूद्वारा यांच्यात होणारी गर्दी पाहता प्रशासनाने देवस्थांनांमध्ये भाविकांना प्रवेशास बंदी घातली. तेथे फक्त पुजारी जाऊनच धार्मिक विधी करतील, असे आदेश देण्यात आले. त्याचा परिणाम हा मंदिरांच्या उत्पन्नावर झाला. मंदिरांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत हा देणगी आहे. देणगीच घटल्याने मंदिरांचे उत्पन्न कमी झाले. मात्र खर्च कमी झाले नाही. मंदिरांना सर्वात जास्त खर्च हा विद्युत बिलांवर करावा लागतो. शहरातील ओंकारेश्वर मंदिरात सध्या श्रावण महिन्यात विद्युत रोषणाई केली जाते. दर वर्षा प्रमाणे यंदाही रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिरांचे उत्पन्न कमी आणि विजेचा खर्च जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शहरातील ओंकारेश्वर मंदिरांमध्ये श्रावण महिन्यात आतापर्यंत सुमारे अडीच लाख रुपये देणगी गोळा झाली आहे. तर दर वर्षाचे वीजबीलच एवढ्या रकमेचे होत आहे. त्याव्यतिरिक्त देखील इतर खर्च मंदिराच्या व्यवस्थापनाला नेहमी करावे लागतात.
कोट -
दरवर्षी श्रावण महिन्यात मिळणाऱ्या देणगीपेक्षा यंदा देणगी ७५ टक्क्यांनी कमी आली आहे. तसेच दर महिन्याला मिळणारी देणगीही घटली आहे. त्या तुलनेने खर्च मात्र फारसा कमी झालेला नाही. श्रावण महिन्यात मंदिरावर रोषणाई केली जाते. त्यामुळे विजेचे बिल देखील वाढले आहे - जुगल किशोर जोशी, व्यवस्थापक