शिवतीर्थ मैदानावर भरला भाजीपाल्याचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:16 IST2021-04-09T04:16:05+5:302021-04-09T04:16:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनाकडून शहरात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. ...

शिवतीर्थ मैदानावर भरला भाजीपाल्याचा बाजार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनाकडून शहरात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधांकडे शहरातील हॉकर्सकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नव्हते, यामुळे बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व उपायुक्त संतोष वाहुळे यांनी शहरातील हॉकर्सची बैठक घेऊन मनपाने निश्चित केलेल्या जागांवर व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी अनेक हॉकर्सने बळीराम पेठ किंवा सुभाष चौक या भागात व्यवसाय न करता शिवतीर्थ मैदानावर व्यवसाय थाटल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानादेखील शहरातील हॉकर्स नियम पाळायचा तयारीत नसल्याने महापालिका प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्या हॉकर्सवर जोरदार कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाईदरम्यान मंगळवारी काही फळ विक्रेत्यांनी मनपा उपायुक्तांच्या वाहनावर दगडफेकदेखील केली होती. या घटनेनंतर मनपा व पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. बुधवारी महापालिकेत जिल्हा पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्तांनी हॉकर्सची बैठक घेऊन मनपाने निश्चित केलेल्या जागांवर व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच महापालिकेने निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त इतर जागांवर हॉकर्सने व्यवसाय केला तर कारवाईसह गुन्हेदेखील दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर गुरुवारी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बळीराम पेठ, सुभाष चौक वर शिवाजी रोड परिसरात काही प्रमाणात शुकशुकाट पाहायला मिळाला. काही विक्रेत्यांनी या ठिकाणी दुकाने थाटली होती. मात्र मनपाचे पथक आल्यानंतर या विक्रेत्यांनीदेखील या ठिकाणावरून पळ काढत शिवतीर्थ मैदानावर नियमानुसार दुकाने लावली होती.
गल्लीबोळातील बाजारांवर कारवाई करण्याची गरज
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने शहरातील आठवडे बाजार बंद केले आहेत. मात्र तरीही अनेक विक्रेत्यांनी शहरातील गल्लीबोळात बाजार सुरू केले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी ही नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मनपा प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठ परिसर विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम राबवली असली तरी शहरातील गल्लीबोळात भरणाऱ्या बाजारांवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.
महापालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या ९ जागा
महापालिका प्रशासनाने शहरातील हॉकर्सला व्यवसायासाठी नाव व जागा निश्चित करून दिल्या आहेत. यामध्ये गोलाणी मार्केट, शिवतीर्थ मैदान, ख्वाॅजामिया चौक मैदान, संभाजी राजे नाट्यगृह परिसर, मानराज पार्क, सत्य वल्लभ हॉल, पडकी शाळा सिंधी कॉलनी, लॉ कॉलेजचे मैदान व आय एम आर महाविद्यालयाची पार्किंग.