दोन वर्षांपासून पुलामुळे त्रस्त असलेल्या शिवाजीनगरवासीयांना रस्त्यांनीही केले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST2021-09-24T04:21:02+5:302021-09-24T04:21:02+5:30

मोटारसायकलच काय, पायी चालणेदेखील झाले कठीण : अनेक वर्षांची व्यथा ऐकणार तरी कोण? लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ...

Shivajinagar residents, who have been suffering from the bridge for the last two years, have also been affected by the roads | दोन वर्षांपासून पुलामुळे त्रस्त असलेल्या शिवाजीनगरवासीयांना रस्त्यांनीही केले त्रस्त

दोन वर्षांपासून पुलामुळे त्रस्त असलेल्या शिवाजीनगरवासीयांना रस्त्यांनीही केले त्रस्त

मोटारसायकलच काय, पायी चालणेदेखील झाले कठीण : अनेक वर्षांची व्यथा ऐकणार तरी कोण?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील नागरिक गेल्या अडीच वर्षांपासून पुलाचे काम रखडले असल्याने, काही किमीचा फेरा मारून शहरात येत आहेत. हा त्रास कमी होता की काय, त्यात शिवाजीनगर भागातील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे शिवाजीनगरवासीयांची वाट अजून बिकट झाली आहे. ही समस्या ना मनपा प्रशासन सोडायला तयार आहे, ना लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार आहेत. या भागातील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, मोटारसायकल चालविणे तर सोडाच पायी चालणेदेखील कठीण झाले आहे.

शिवाजीनगर भाग हा शहरातील महत्त्वाचा भाग असून, या परिसरातूनच जळगाव तालुक्यातील ३२ गावांमधील नागरिकांसह चोपडा व यावल तालुक्यातील वाहतूकदेखील याच भागातून होत असते. नेहमी वाहतुकीची वर्दळ असलेल्या या परिसरातील रस्त्यांकडे मात्र मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बुधवारी या भागातील अमर चौक परिसरात मालवाहतूक करणारी ट्रक खड्ड्यात फसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. ही परिस्थिती केवळ एक दिवसापुरती नसून गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील नागरिक खराब रस्त्यांच्या समस्येला तोंड देत आहेत.

भुयारी गटार योजनेने लावली रस्त्यांची वाट

शहरात अमृत योजनेंतर्गत झालेल्या भुयारी गटार योजनेचे ४० टक्के काम हे केवळ शिवाजीनगर परिसरात झालेले आहे. त्यात मनपा अधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे निविदेत केलेल्या चुकीमुळे भुयारी गटार योजनेंतर्गत खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारावर न सोपविल्याने ठेकेदाराने रस्ते खोदल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली नाही. ही जबाबदारी महापालिकेने स्वतःवर घेतल्यामुळे महापालिकेनेदेखील या रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे भुयारी गटार योजना शहरासाठी चांगली ठरली असली तरी शिवाजीनगर भागातील नागरिकांना ही योजना चांगलीच त्रासदायक ठरत आहे.

अपघात झाले नित्याचेच

शिवाजीनगर भागाकडून कानळदा व ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यासह शिवाजीनगरातील अंतर्गत रस्त्यांचीदेखील पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यात पाऊस झाल्यानंतर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचत आहे. त्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने व भुयारी गटार योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या चाऱ्यांचीदेखील दुरुस्ती मनपाने न केल्यामुळे या भागातील रस्त्यांवर लहान-मोठे अपघात हे नित्याचेच झाले आहेत.

आंदोलन करून व निवेदने देऊनदेखील झाला नाही फायदा

शिवाजीनगर भागातील रस्त्यांच्या समस्येबाबत महापालिका प्रशासनाकडे आतापर्यंत ५० हून अधिक निवेदने सादर झाली आहेत. तसेच रस्त्यांच्या समस्येबाबत या भागातील नागरिकांनी आतापर्यंत गेल्या तीन वर्षात दहापेक्षा जास्त आंदोलने केली आहेत. मात्र निवेदने देऊन व आंदोलने करूनदेखील महापालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. तसेच मनपा प्रशासनाने काही महिन्यापूर्वी या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती केली होती. मात्र, काही महिन्यातच या रस्त्यांच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

या भागात येणाऱ्या कॉलनी

गेंदालाल मिल, शिवाजीनगर, लाकूड पेठ, दांडेकरनगर या सर्व भागांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

नगरसेवक - ८

लोकसंख्या - ३४ हजार

तीन तालुक्यांची वाहतूक या भागातून होते.

Web Title: Shivajinagar residents, who have been suffering from the bridge for the last two years, have also been affected by the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.