शिवसेनेचा 'दे धक्का'

By Admin | Updated: October 20, 2014 10:09 IST2014-10-20T10:09:09+5:302014-10-20T10:09:09+5:30

तब्बल चार वर्षे नऊ खात्यांचे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना शिवसेनेने पराभूत करून धक्का दिला आहे.

Shiv Sena's 'De push' | शिवसेनेचा 'दे धक्का'

शिवसेनेचा 'दे धक्का'

 

धरणगाव : तब्बल चार वर्षे नऊ खात्यांचे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना शिवसेनेने पराभूत करून धक्का दिला आहे. दोन गुलाबरावांच्या अस्तित्वाच्या या लढाईत शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी बाजी मारली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रभुत्व असताना २00९ च्या निवडणुकीत जळगाव निवासी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा विजय झाला होता. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात गुलाबराव पाटील यांचा झालेला पराभव शिवसैनिकांना जबर धक्का देऊन गेला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसैनिकांनी चंग बांधला होता. तर पराभव पत्करून घरी न बसता गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघाशी नाळ जोडत त्यांच्या सुखदु:खात हिरिरीने भाग घेऊन सर्वांना आपलेसे केले होते. नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बहुतेक ग्रामपंचायती या पाच वर्षात शिवसेनेच्या ताब्यात होत्या. फक्त आमदारकी मिळावी यासाठी शिवसेनेने 'अब की बार, भाऊ आमदार' हे मिशन राबविले व ते यशस्वीही झाले. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी धरणगाव तालुक्यात व शहरात सुरुवातीला सर्वांना विश्‍वासात घेऊन कामे केली. मात्र धरणगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत देवकारांनी ज्ञानेश्‍वर महाजन यांच्याविरोधात घेतलेला निर्णय व त्यांच्या विरुद्ध दाखल केलेले अपात्रता प्रकरण याचाही फटका या निवडणुकीत बसल्याचे दिसते. माळी समाजाने महाजन यांच्यावर झालेला अन्याय मतदान रूपाने व्यक्त केल्याचाही अंदाज व्यक्त होत आहे. या सर्व गोष्टी शिवसेनेला बळकटी देणार्‍या ठरल्या व देवकरांना त्याचा फटका बसला. त्यात धरणगाव शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम न झाल्याने नाराजीचा सूर होता. भाजपाचे उमेदवार म्हणून जि.प.चे माजी शिक्षण सभापती पी.सी. पाटील यांनी फक्त १५ दिवसात मिळविलेली मतेही कौतुकास्पद आहेत. त्यांना ४४ हजार मते मिळून ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले. त्यांना माजी मंत्री देवकर यांच्यापेक्षा फक्त ८ हजार ६४२ मते कमी पडली. त्यांनी आता घेतलेली आघाडी भविष्यात त्यांना फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डी.जी. पाटील व मनसेचे उमेदवार मुकुंदा रोटे यांच्यावर अनामत जप्त होण्याची नामुष्की आली. काँग्रेसने डी.जी. पाटील यांच्या प्रचारार्थ एकही सभा दिली नाही. त्यांना वार्‍यावर सोडले होते. तर मनसेचे उमेदवार यांनी साधी प्रचारपत्रिकाही करण्याची तसदी घेतली नाही. या मतदारसंघाने पूर्वी दोनदा व आता असे तीनदा आमदारकीची संधी दिली आहे. त्यामुळे साहजिकच विकासकामांची अपेक्षा गुलाबराव पाटील यांच्याकडून मतदारांना आहे. शहराचा जलशुद्धीकरण केंद्राचा प्रश्न व उर्वरित विकासकामे त्यांनी मार्गी लावून मतदारसंघाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Shiv Sena's 'De push'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.