शिवसेना करणार भाजपाशी चर्चा
By Admin | Updated: February 3, 2015 17:21 IST2015-02-03T17:21:49+5:302015-02-03T17:21:49+5:30
शिवसेनेने जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंबंधी आपली भूमिका ठरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत भाजपासोबत चर्चा करण्याचे निश्चित केले आहे.

शिवसेना करणार भाजपाशी चर्चा
जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पहिला टप्पा सुरू झालेला असतानाच राजकीय पक्षांमध्ये मात्र अजून चर्चा सुरू नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात. परंतु शिवसेनेने या निवडणुकीसंबंधी आपली भूमिका ठरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत भाजपासोबत चर्चा करण्याचे निश्चित केले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंबंधी पात्र विविध कार्यकारी सोसायट्या व इतर सभासद संस्थांचे मतदानासंबंधीचे ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मागविले आहेत. तसेच मुदत संपलेल्या संस्थांची निवडणूक घेऊन या संस्थांचे ठरावही घेण्याची तयारी केली आहे. प्रशासकीय पातळीवर ही प्रक्रिया सुरू आहे.
गत निवडणुकीत भाजपाच्या मंडळीसोबत जाऊन सहकार पॅनेल स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्या शिवसेनेने अजून कुठलीही चर्चा सुरू नाही, असे म्हटले आहे.
मागील निवडणुकीत शिवसेनेचे सुरेशदादा जैन, चिमणराव पाटील, माजी आमदार कैलास पाटील, किशोर पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे ही मंडळी सहकार पॅनेलमधून ही मंडळी निवडून आली होती.
उपनेतेही इच्छुक
या निवडणुकीत मात्र शिवसेनेची मंडळी कुणासोबत जाईल, हे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले नाही. जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यात उपनेते गुलाबराव पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे आणि किशोर पाटील यांचा समावेश आहे. पैकी प्रा.सोनवणे व किशोर पाटील हे विद्यमान संचालक आहेत. त्यातच जिल्हा बँकेचे वरिष्ठ व अनुभवी सदस्य म्हणून ओळख असलेले चिमणराव पाटील यांच्या भूमिकेला बँकेच्या राजकारणात महत्त्व राहील.
अर्थातच सेनेचे चिमणराव पाटील, किशोर पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे हे पुन्हा एकदा जिल्हा बँक निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील, असे संकेत मिळत आहेत. तसेच उपनेते गुलाबराव पाटील हेदेखील धरणगाव तालुक्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. पण या वृत्ताबाबत उपनेत्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेले नाही.
चर्चा करणार
यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत आमच्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. सध्या कुणासोबतही चर्चा सुरू नाही किंवा चर्चाही केलेली नाही. परंतु लवकरच मुंबईत महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासोबत चर्चा करू, असेही ते म्हणाले.
-------
शिवसेनेची जिल्हा बँक निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची राहील. पण अजून कोणतीही चर्चा कुठल्याही नेत्याशी, पक्षाशी झालेली नाही. समविचारी, बँकेचे हित जोपासणार्या पॅनेलसोबत जाऊ.
-गुलाबराव पाटील, उपनेते, शिवसेना