कुणाच्या फायद्यासाठी शिरसोली रस्ता पीडब्ल्युडीकडे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:08+5:302021-09-24T04:18:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील इच्छादेवी चौकापासून जळगाव-पाचोरा- चाळीसगाव या रस्त्याला सुरूवात होते. आधी हा संपूर्ण रस्ता सार्वजनिक ...

Shirsoli Road to PWD for whose benefit? | कुणाच्या फायद्यासाठी शिरसोली रस्ता पीडब्ल्युडीकडे ?

कुणाच्या फायद्यासाठी शिरसोली रस्ता पीडब्ल्युडीकडे ?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील इच्छादेवी चौकापासून जळगाव-पाचोरा- चाळीसगाव या रस्त्याला सुरूवात होते. आधी हा संपूर्ण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र, नंतरच्या काळात हा रस्ता दुपदरीकरण करण्यासाठी २०१६च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वळता करण्यात आला. मात्र, त्यातील सुरूवातीचा सहा किमीचा इच्छादेवी चौक ते देवकर अभियांत्रिकी हा रस्ता त्यावेळी महापालिकेकडे वर्ग करण्यात आला होता. आता हा रस्ता महापालिकेने देखभाल आणि दुरूस्तीसाठी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला आहे. या रस्त्याचा हा प्रवास नेमका कुणाच्या फायद्यासाठी केला गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सन २०१६ मध्ये जळगाव ते नांदगाव महामार्ग विकसित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यात जळगाव शहरातील इच्छादेवी मंदिरापासून या रस्त्याला सुरूवात केली जाणार होती. हा रस्ता पुढे शिरसोली-पाचोरा-चाळीसगाव असा आहे. मात्र, महामार्ग रुंदीकरणाच्या प्रक्रियेत शहरातील काही प्रमुख बांधकाम व्यावसायिकांची जमीन जाणार असल्याने हा रस्ता त्यावेळी महापालिकेकडे देण्यात आला होता. आता पुन्हा या रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. शहर महापालिकेची परिस्थिती पाहता ते हा रस्ता देखभाल करु शकतील का? यावरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर वारंवार होणारी दुरवस्था पाहता हा रस्ता अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला.

रस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता विकास महाले यांनी सांगितले की, महापालिकेच्या हद्दीपासून इच्छादेवी मंदिरापर्यंतचा रस्ता हा आमच्या हद्दीत नाही. हा संपूर्ण रस्ता १०४ किमीचा आहे. मात्र, त्यातील सुरूवातीचे अंतर त्यातून वगळण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात दिलेल्या रस्त्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आले आहे.

महापालिकेचे शहर अभियंता अरविंद भोसले यांनी सांगितले की, हा रस्ता पूर्वीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. आता पुन्हा एकदा हा रस्ता त्या विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. महापालिका तेथील अतिक्रमण काढून देणार आहे.

Web Title: Shirsoli Road to PWD for whose benefit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.