‘ती’ने लग्नाला नकार दिला, त्याने बंदुकीने मारण्याची धमकी दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:53+5:302021-07-28T04:17:53+5:30
जळगाव : लग्नास नकार दिल्याच्या रागातून सचिन त्र्यंबक जाधव (रा.हिंजवडी, पुणे) या तरुणाने एमबीए झालेल्या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर ...

‘ती’ने लग्नाला नकार दिला, त्याने बंदुकीने मारण्याची धमकी दिली
जळगाव : लग्नास नकार दिल्याच्या रागातून सचिन त्र्यंबक जाधव (रा.हिंजवडी, पुणे) या तरुणाने एमबीए झालेल्या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यासह बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सचिन याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २३ वर्षीय तरूणीचे शिक्षण एमबीए झाले आहे. पुण्यात शिक्षण घेत असताना सचिन त्र्यंबक जाधव या तरूणाशी २०१९ मध्ये ओळख झाली. मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाल्याने सचिन जाधव याचे तरुणीशी सतत बोलणे होत असे. तिने कुटुंबाशीही ओळख करुन दिली होती. सचिन याची परिस्थिती गरीबीची असल्यामुळे त्याला वेळोवेळी तरुणी व तिच्या वडिलांनी मदत केली. त्यातून सचिन हा तिच्याशी एकतर्फी प्रेम करु लागला. ३१ डिसेंबर २०१९ रोजी अचानक घरी बोलावून लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यास तिने नकार दिला. त्याचा राग आल्याने सचिनने सतत तरुणीला त्रास देणे सुरु केले. सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यापासून तर तिच्यावर लक्ष ठेवू लागला. लॉकडाऊनमुळे तरुणी जळगावला घरी आली असता १७ जुलै रोजी सचिन देखील थेट तरुणीच्या घरी आला. तु माझा फोन का घेत नाही. मला प्रतिसाद का देत नाही. पुढच्यावेळी जर माझ्याशी बोलली नाही किंवा फोन घेतला नाही तर बंदुक घेऊन येईल व तुला मारुन टाकेल अशी धमकी दिली. लग्नाला नकार दिल्यानेच सचिन धमकी देत असल्याचे तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे.