मंगरूळला तीव्र पाणीटंचाई
By Admin | Updated: December 31, 2015 01:06 IST2015-12-31T01:06:20+5:302015-12-31T01:06:20+5:30
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे.

मंगरूळला तीव्र पाणीटंचाई
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. गेल्या सहा दिवसांपासून गावात पाणी नसल्याने, शासनाने तातडीची उपाययोजना करण्याची मागणी सरपंच अनिल अंबर पाटील यांनी केली आहे. मंगरूळ गावाला बोरी काठावरील हिंगोणे व कोळपिंप्री येथील विहिरीवरून 10 ते 11 किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने, बोरी नदीला पाणीच आले नाही. त्यामुळे विहिरीचे पुनर्भरण झाले नाही. विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने, गेल्या सहा दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. गाव विहिरीत टाकायलाही पाणी नाही. तामसवाडी धरणातही मृत साठाच शिल्लक असल्याने, यंदा आवर्तन सुटणेही अशक्य आहे. मंगरूळ हे गाव अवर्षणप्रवण भागात येत असल्याने, विहिरींना पाणी नाही. त्यामुळे विहीर अधिग्रहण करूनही उपयोग नाही. कोळपिंप्री येथील विहिरींमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने, मंगरूळ, शिरूड या दोन्ही गावांना अडचण निर्माण झालेली आहे. मंगरूळ ग्रामपंचायतीने टंचाईसंदर्भात आढावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठवला आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 10 हजार असल्याने, तेथे टॅँकरने पाणीपुरवठा करणेही शक्य नाही. आतापासूनच येथे भीषण पाणीटंचाई भासू लागली असून, आगामी सहा महिन्यात बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शिरूडची लोकसंख्या साडेचार हजार असून, पाणीपुरवठय़ासाठी दुसरी योजना नाही. इंदासे धरणाचा पर्याय अमळनेर तालुक्याच्या सीमेवर, पारोळा तालुक्यात इंदासे धरण शिरूडपासून पाच तर मंगरूळपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तेथून पाईपलाईन टाकून या दोन्ही गावांची समस्या सुटू शकते. गेल्यावर्षी याच धरणावरून अमळनेर तालुक्याला टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे शासनाने तात्पुरती पाईपलाईन टाकून इंदासे धरणावरून दोन्ही गावांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सरपंच पाटील यांनी केली आहे. (वार्ताहर)