इच्छादेवी चौकातील अतिक्रमणधारकांना सात दिवसांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:18+5:302021-09-23T04:19:18+5:30
पक्के बांधकाम असल्याने देण्यात आली मुदत : इतर रस्त्यांवरील अतिक्रमण मात्र काढणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेने बांधकाम ...

इच्छादेवी चौकातील अतिक्रमणधारकांना सात दिवसांची मुदत
पक्के बांधकाम असल्याने देण्यात आली मुदत : इतर रस्त्यांवरील अतिक्रमण मात्र काढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेने बांधकाम विभागाकडे वर्ग केलेल्या ६ रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यास मनपा प्रशासनाने मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली होती. त्यापैकी इच्छादेवी चौक ते डीमार्ट पर्यंतच्या असलेल्या रस्त्यावरील पक्के अतिक्रमण काढण्यास बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, याठिकाणी पक्के बांधकाम असल्याने, ते काढल्यास घरांना देखील धोका पोहचणार असल्याने, हे अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्यास अतिक्रमणधारकांनी तयारी दर्शविल्याने, मनपाकडून आता या अतिक्रमणधारकांना सात दिवसांची मुदत दिली आहे.
इच्छादेवी चौक ते डीमार्ट पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना मनपाने बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, ही कारवाई काही दिवस टाळण्यात यावी या मागणीसाठी या रस्त्यावर असलेल्या दुकानदार व काही रहिवाशांनी बुधवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांची भेट घेतली. यावेळी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे हे देखील उपस्थित होते.
कोणत्याही अतिक्रमणाला दिले जाणार नाही अभय - वाहुळे
यावेळी अतिक्रमणधारकांनी हा रस्ता १८ मीटरचा असून, सर्व घरे व दुकाने ही गटारीच्या आत असल्याचे सांगितले. त्यामुळे गटारीच्या बाहेरील अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी केली. मात्र, मनपा उपायुक्तांनी हा रस्ता ३० मीटरचा असल्याचे सांगत, या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी काही वेळ दिला जाईल. मात्र, कोणत्याही अतिक्रमणाला अभय दिले जाणार नसल्याचे ठणकावत जे अतिक्रमण काढायचे असेल ते काढून घ्या. मात्र, सात दिवसानंतर १ इंच अतिक्रमण असेल तर तेही तोडण्यात येईल असा इशाराच वाहुळे यांनी दिला.
दिवाळीपर्यंत संधी देण्याची मागणी
या रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनी पुढे नवरात्रोत्सव, दिवाळी सारखे सण असल्याने दिवाळीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली. मात्र, हा रस्ता बांधकाम विभागाकडे असल्याने अतिक्रमण कारवाई रखडल्यास रस्त्याचेही काम रखडेल असे वाहुळे यांनी सांगितले. त्यामुळे दुकानदारांची मागणी मनपा प्रशासनाने फेटाळून लावली. दरम्यान, सोमवारी याबाबत मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन महापौर जयश्री महाजन यांनी दिले.