ममुराबाद रस्त्यालगतच्या पक्क्या अतिक्रमणधारकांना सात दिवसांचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST2021-03-27T04:16:32+5:302021-03-27T04:16:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील शनी मंदिर परिसरातील ममुराबाद रस्त्यालगत अतिक्रमण करून पक्के बांधकाम केलेल्या अतिक्रमणधारकांना सात दिवसांच्या ...

ममुराबाद रस्त्यालगतच्या पक्क्या अतिक्रमणधारकांना सात दिवसांचा अल्टिमेटम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील शनी मंदिर परिसरातील ममुराबाद रस्त्यालगत अतिक्रमण करून पक्के बांधकाम केलेल्या अतिक्रमणधारकांना सात दिवसांच्या आत सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिले आहेत. या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे नियमित वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने उपायुक्तांनी सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत.
ममुराबाद रस्त्यालगत दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यामुळे या रस्त्यालगत दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाचा अभियंत्यांनी या भागात जाऊन मूल्यांकन केल्यानंतर अनेक रहिवाशांनी रस्त्यालगत सुमारे चार ते पाच फुटांचे अतिक्रमण घेतल्याचे लक्षात आले आहे. नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी या भागातील अतिक्रमण काढण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत. उपायुक्त संतोष वाहुळे यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या भागाची पाहणी केली. या रस्त्यालगत अनेक भाजीपाला विक्रेते व पदार्थ विक्री करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटल्याने देखील हा रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे लक्षात आले होते. उपायुक्तांनी तत्काळ अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्व विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. यासह या रस्त्यालगत सुरू असलेल्या दोन टपऱ्यादेखील जेसीबीद्वारे तोडण्यात आल्या. यासह सर्व अतिक्रमणधारकांना देखील महापालिका प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून सात दिवसांच्या आत सर्व अतिक्रमित बांधकाम तोडण्याचा सूचना उपायुक्तांनी दिल्या आहेत. यासह उपायुक्तांनी शुक्रवारी शहरातील गल्लीबोळात भाजीपाल्याचे दुकान थाटणाऱ्यांवर देखील कारवाई केली आहे.