लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : कोरोनामुळे शाळांची टाळेबंदी अजूनही कायम आहे. नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असली तरी, शाळा ऑनलाईनच सुरू आहेत. गतवर्षी सरसकट ‘वर्गोन्नत’ झालेल्या विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेशी जोडण्यासाठी ‘सेतू अभ्यासक्रम’ (ब्रिज कोर्स) हा ४५ दिवसांचा पाठ्यक्रम तयार करण्यात आला आहे. इयत्ता दुसरी ते दहावीचे विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. गुरुवारी त्याची जिल्हाभरातील शाळांमध्ये सुरुवात झाली. तथापि, हा अभ्यासक्रम ऑफलाईन सोडवायचा की ऑनलाईन यासह चाचणीही कशी घ्यायची ? अशा काही प्रश्नांमुळे शिक्षकांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण आहे.
गतवर्षी कोरोनामुळे शाळा उघडल्याच नाहीत. यावर्षीही १५ रोजी नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मात्र, अद्यापही शाळा बंदच आहेत. अशा स्थितीत मागील इयत्तेत विद्यार्थी काय शिकला? यासह पुढील इयत्तेचा पाठ्यक्रम समजून घेण्याचा मूळ उद्देश सेतू अभ्यासक्रमाशी निगडित आहे. गुरुवारपासून राज्यभरात सेतू अभ्यासक्रमाला प्रारंभ झाला असून इयत्तानिहाय पाठ्यक्रम मोबाईलमध्ये डाऊनलोड करून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची मोठी कसरत शिक्षकांना करावी लागणार आहे.
चौकट.
सुरुवातीलाच अडचणीच्या घंटा
गेल्यावर्षी ऑनलाईन शिक्षणाचे पुरते वस्रहरण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण किती पोहोचले ? या प्रश्नाचे अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे सेतू अभ्यासक्रमाला सुरुवात होताच अडचणीच्या घंटाही वाजू लागल्या आहे.
१...सेतू अभ्यासक्रम ४५ दिवस चालणार आहे. जाणून घेऊया, सक्षम बनूया, सराव करुया, कल्पक होऊया आदी चार विभागात अभ्यासक्रम विस्तारला आहे. कृतीबरोबरच स्वयंप्रयत्नाने अभ्यासक्रम सोडवायचा आहे. आवश्यक तिथे शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करावे, असे अपेक्षित आहे.
२...मौखिक भाषा विकास, ध्वनीची जाण, लिपीची जाण, वाचन, लेखन असे अध्ययन क्षेत्र भाषा विषयासाठी निर्धारित केले आहे. विषयनिहाय असे क्षेत्र निश्चित केले गेले आहे.
३...प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांकडून कृतीसह स्वाध्याय सोडवून घ्यायचे आहे.
४...यामुळे अभ्यासक्रमाच्या प्रिंट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. या प्रिंटचा खर्च कुणी करायचा ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
५...एखाद्या शाळेची इयत्ता दुसरी ते दहावीची पटसंख्या पाचशे असेल तर प्रिंटसाठी ३० हजार रुपये खर्च येणार आहे.
चौकट
स्वाध्याय सोडवायचे कसे ?
सेतू अभ्यासक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे क्रमप्राप्त आहे. यातही कोरोनाची टांगती तलवार आहे. काही शाळांनी मुलांना गटाने बोलवण्याची तयारी केली. दहा विद्यार्थ्यांचा एक गट केल्यास सेतू अभ्यासक्रम फळ्यावर सोडवून घेणे शक्य होईल. मात्र,वर्षभरापासून संपर्कात नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे कसे ? साथरोगापासून त्यांचा बचाव करायचा कसा ? असे एक ना अनेक प्रश्न उभे ठाकले आहे. विद्यार्थ्यांना गटाने शाळेत बोलविल्यास प्रिंटचा खर्च होणार नाही. मराठी माध्यमासह सेमी इंग्रजीही अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे.
चौकट
दर १५ दिवसाला चाचणी
४५ दिवसांत विद्यार्थ्यांना दर पंधरा दिवसाला एका चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. चाचणीचे पेपर तपासून शिक्षकांना गुणनोंद करावी लागणार आहे. ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासक्रमात तीन चाचण्या होणार आहे.
महत्त्वाची चौकट
जिल्ह्यात सात लाख विद्यार्थी.
जिल्हाभरात जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीचे सात लाख ६४६ विद्यार्थी सेतू अभ्यासक्रमाशी जोडले जाणे अपेक्षित आहे. इयत्तानिहाय विद्यार्थी असे : दुसरी - ७६, ५१४ तिसरी - ७९, ३१३ चौथी - ७७, ९१८ पाचवी - ८०, ०५० सहावी - ७८, २२८ सातवी - ७७, ३११ आठवी - ७७, ६७७ नववी - ७६, ६७७ दहावी - ७६, ३५८ एकूण - ७,००, ६४६ ............
सेतू (ब्रिज कोर्स)बाबत जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व केंद्रप्रमुखांना सूचना दिल्या आहे. गुरुवारी शिक्षकांनी मोबाईलवरील लिंक वरून इयत्तानिहाय अभ्यासक्रम डाऊनलोड केला आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणतीही अडचण नाही. शिक्षकांनी सेतू अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवावा.
- बी. जे. पाटील, शिक्षणाधिकारी, माध्यमिक जि. प. जळगाव.