सर्ज्या-राज्याची शेपटी, कोरोना महामारीला थोपटी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:39+5:302021-09-07T04:22:39+5:30

खेडगाव, ता. भडगाव : मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट होते. मागील बैलपोळा सुना गेला. यावेळेस नाही म्हटल्यास कोरोनाची ...

Serjya-Rajya's tail, Corona epidemic ..! | सर्ज्या-राज्याची शेपटी, कोरोना महामारीला थोपटी..!

सर्ज्या-राज्याची शेपटी, कोरोना महामारीला थोपटी..!

खेडगाव, ता. भडगाव : मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट होते. मागील बैलपोळा सुना गेला. यावेळेस नाही म्हटल्यास कोरोनाची भीती, निर्बंध होतेच. जिवाभावाच्या मैतराचा बारा महिन्यांचा सण म्हणून तो कृतज्ञतापूर्वक व फारशी गर्दी न होऊ देता येथे शांततेत साजरा झाला.

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रे लॉक झाली असताना कृषी क्षेत्र मात्र अर्थव्यवस्थेला सावरत होते. ही सुबत्ता चालत आली ती शेतकऱ्यांचा मैतर असलेल्या सर्ज्या-राज्याच्या शेपटीला धरून, महादेवाच्या नंदीच्या पावलांनी म्हणूनच खेडगावच्या वेशीत गाव कारू-नारूनी चांगभलं..चांगभलंचा निनाद करत..चांगले व्होवो..जनकल्याण व्होवो..! ही कामना वृषभराजच्या साक्षीने केली.

कोरोना महामारी, पावसाचा खंड, अतिपाऊस अशा विपरीत परिस्थितीत देखील शेतकऱ्यांनी मागील सप्ताहभरापासून बैलपोळ्याची तयारी चालवली होती. रानातील, बांधावरील गवताची जिवाभावाच्या मैतराला मेजवानी देत शिंग, शेपटी सवरून घेत त्याला बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी सचैल स्नान घालीत खांदेमळणी करण्यात आली होती. कोरोना अनुषंगाने गावातून दवंडी पिटल्याने शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातच बैलांच्या शिंगांना हिंगूळ (रंग ) लावले. त्याच्या अंगाखांद्यावर असे पायाच्या खुरापासून ते शिंगांपर्यंत रंगांनी सजविण्यात आले. गळ्यात घाट्या, गेजा, घुंगरमाळा, गेठा, नाकात वेसण, नाथ, कासरे (दोरखंड), म्होरकी, शिंगांना बेगड, पितळी श्याम्या, पायात पैंजण, तोडे, अंगावर झुली व रंगीबेरंगी फुग्यांनी सजविण्यात आली. गावातील देवादिकांच्या मंदिरांत तसेच गावशिवारातील, विहिरीवरील म्हसोबा आदींना नारळ फोडण्यात आले.

दुपारनंतर वेशीला तोरण बांधण्यात आल्यानंतर गाव कारू नारूंनी झड्यांग..झ्यांडा...असा डफाचा ताल व चांगभलंचा निनाद केला. शेतकऱ्यांनी सजविलेल्या बैलजोड्या आपल्या घरी नेत पूजा केली. त्यांना पुरणपोळी भरवत तृप्त करण्यात आले. यानंतर मारुती पारावर गाव कारू-नारूंनी त्यांच्या भाळी विभूतीपूजन केले. बैलपोळ्यानिमित्त गावी आलेले नोकरदार, घरातील नातू-पणतू यांनी भाऊबंदकी-कुटुंबासमवेत कोरोनाचे सावट सारत बैलपोळा गोड केला.

Web Title: Serjya-Rajya's tail, Corona epidemic ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.