महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:38+5:302021-06-21T04:13:38+5:30
भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून ग्रीन पार्कचे दोघे तरुण रेल्वे कर्मचारी अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची ...

महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून ग्रीन पार्कचे दोघे तरुण रेल्वे कर्मचारी अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना रविवारी रात्री सव्वा नऊला नाहाटा कॉलेज उड्डाणपुलावर घडली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाले. यापूर्वी अवघ्या चार दिवसांआधी साकेगाव महामार्गावर सिंधी कॉलनीतील दोन सख्खे भावंडांचा अपघातात मृत्यू झाला होता.
अल्ताफोद्दीन बशीरोउद्दीन शेख (२४) व शेख शारीक शेख इद्रीस (२३) (दोघे रा. ग्रीन पार्क, बिसमिल्ला चौक खडका रोड, भुसावळ) हे दुचाकी (एमएच-१९-सीटी-११०२) ने जळगावहून भुसावळच्या दिशेने घरी जात होते. तेव्हा उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अल्ताफोउद्दिन व मोहम्मद शारीक हे दोघेही नुकतेच आपल्या वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर रेल्वेत नोकरीवर लागले होते. अल्ताफच्या पश्चात चार भाऊ, एक बहीण, आई, वडील तर शारीकच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे. घटनेची माहिती समजताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक निरीक्षक हरीश भोये, मंगेश गोंटला, अनिल मोरे, रवींद्र बिराडे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी धाव घेत विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली ,तसेच ग्रीन पार्क येथील मोहम्मद इरफान, रईस पिंजारी, सज्जाद ठेकेदार, शरद कराडे, यांच्यासह नगरसेवक पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, शेख आरिफ गणी आदींनी मृतदेह रुग्णालयात हलविण्यासाठी मदतकार्य केले.
महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच
अगदी चार दिवसांपूर्वी सिंधी कॉलनी येथील मनीष दर्डा व रितेश दर्डा हे सख्खे भावंडे जळगावकडून भुसावळकडे जात असताना साकेगावजवळ ठार झाले होते. या घटनेला चार दिवस उलटत नाहीत तोच दोन रेल्वे कर्मचारी मित्राचा त्यास घटनेप्रमाणे दुर्दैवी अंत झाला.
दरम्यान, महामार्गावर उड्डाण पुलावर बंद पथदिवे व महामार्ग नवीन असल्यामुळे अजूनही अनेकांना महामार्गाचा अंदाज येत नाही. बंद पडलेले पथदिवे त्वरित सुरू करावे यासह सर्विस रोडही सुरू करावे, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.