अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी सहा वाळू गटांची बँक गॅरंटी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST2021-07-27T04:17:34+5:302021-07-27T04:17:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाळू गट लिलावानंतर उचल करताना अटी शर्तींचा भंग केल्या प्रकरणी सहा वाळू गटांची एकूण ...

अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी सहा वाळू गटांची बँक गॅरंटी जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाळू गट लिलावानंतर उचल करताना अटी शर्तींचा भंग केल्या प्रकरणी सहा वाळू गटांची एकूण १५ लाख ४६ हजार ५०४ रुपयांची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली आहे. या सोबतच अतिरिक्त वाळू उचल केल्याप्रकरणी वैजनाथ वाळू गटाच्या ठेकेदारास पाच पट दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. आव्हाणी गटातही पर्यावरण विषयक शर्तींचा भंग केल्याप्रकरणीदेखील या गटाला नोटीस बजावण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात २१ वाळू गटांना मंजुरी मिळाल्यानंतर लिलावादरम्यान केवळ आठ वाळू गटांना प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर वाळू उचल होऊन ९ जून रोजी मुदत संपल्यानंतर वाळू गटांनी हे गट समर्पित केले होते. या दरम्यान वाळू गटांनी अतिरिक्त उचल केल्या प्रकरणी नोटीस बजावण्यात येऊन खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र हे खुलासे अमान्य करण्यात आले. त्यानंतर या गटांना नोटीस बजावून कारवाई प्रस्तावित होती. या प्रकरणात वाळू गटांची टिपणी तयार होऊन संपूर्ण प्रक्रिया होऊन सहा वाळू गटांची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली आहे.
या गटांची जप्त झाली बँक गॅरंटी
बांभोरी प्र.चा. वाळू गटाचा ठेका घेतलेल्या पटेल ट्रेडिंगची दोन लाख ८ हजार ३९६ रुपये बँक गॅरंटी जप्त केली. अशाच प्रकारे नारणे वाळू गटाचे ठेकादार सुनंदाई बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सची ३ लाख ४२ हजार २० रुपये, टाकरखेडा वाळू गटाचे व्ही.के. एंटरप्रायजेसची एक लाख २२ हजार ४२२ रुपये, वैजनाथ वाळू गटाचे श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.ची एक लाख १८ हजार रुपये, उत्राण अ.ह. गट नं. ९ चे एमएस बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सची ५ लाख ४ हजार ६ रुपये, उत्राण अ.ह. गट नं. १७ चे महेश सदाशिव माळी यांची २ लाख ५१ हजार ६६० रुपये अशी एकूण १५ लाख ४६ हजार ५०४ रुपये बँक गॅरंटी जप्त करण्यात आली आहे.
पाच पट दंड
वैजनाथ वाळू गटातून अतिरिक्त वाळू उचल झाल्याची तक्रार झाल्याने या वाळू गटातून ३३४ ब्रास अतिरिक्त वाळूची उचल झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पाच पट दंडाची नोटीसदेखील बजावण्यात आली आहे. हा दंड साधारण ७० ते ८० लाखापर्यंत जाऊ शकतो. या सोबतच आव्हाणी वाळू गटात वाळू उचल करताना पर्यावरणविषयक अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.