सलग दुसऱ्या वर्षी बकरी ईदचे नमाजपठण घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:54+5:302021-07-22T04:12:54+5:30

भुसावळ : त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा बकरी ईद सण बुधवारी शहर व परिसरात शांततेत साजरा झाला. रमजान ...

For the second year in a row, Eid prayers are offered at home | सलग दुसऱ्या वर्षी बकरी ईदचे नमाजपठण घरातच

सलग दुसऱ्या वर्षी बकरी ईदचे नमाजपठण घरातच

भुसावळ : त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा बकरी ईद सण बुधवारी शहर व परिसरात शांततेत साजरा झाला. रमजान ईदप्रमाणे या ईदचाही विशेष नमाज पठणाचा सामूहिक सोहळा ईदगाह मैदानावर कोरोनाच्या निर्बंधामुळे होऊ शकला नाही. कोरोना महामारी दूर होवो यासाठी घरोघरी ईदला समाजबांधवांनी दुवा केली.

इस्लामी संस्कृतीतील सणांपैकी 'ईद-उल-अज्हा' अर्थात बकरी ईददेखील मोठा सण म्हणून ओळखला जातो. मागील वर्षीप्रमाणे यंदाही बकरी ईद कोरोनाच्या सावटाखाली शहर व परिसरात पारंपरिक पध्दतीने साजरी करण्यात आली. सामूहिकरित्या नमाजपठणाऐवजी नागरिकांनी आपापल्या घरांमध्येच ईदची नमाज अदा केली. या पवित्र दिनाच्या औचित्यावर नमाजपठणादरम्यान समाजबांधवांनी कोरोनाचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी 'दुवा' मागितली.

पहाटेपासूनच शहरासह परिसरामध्ये मशिदींभोवती पोलिसांचा कडा पहारा रात्रीपर्यंत पहावयास मिळाला. मध्यरात्रीपासून पावसाची संततधारदेखील सुरू झाल्याने मुस्लिमबहुल भागांमध्ये ईदची एरवी दिसणारी रौनक फिकी पडल्याचे जाणवत होते. हस्तांदोलन, आलिंगन, गुलाबपुष्प देत एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देतानाही अपवादानेच नागरिक दिसून आले.

दरम्यान, सकाळी सात वाजता विविध धर्मगुरूंनी ईदनिमित्त समाजबांधवांना उद्देशून शुभेच्छा संदेश दिला. तसेच सरकारच्या सर्व सूचना व नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले.

मुस्लिमबहुल परिसरात ईदनिमित्त रेलचेल अन‌् उत्साहाचे वातावरण अल्पशा प्रमाणात दिसून आले. शुभेच्छा संदेशासाठी पुन्हा एकदा सोशल मीडियाचा वापर तरुणाईकडून अधिकाधिक केला गेला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत एकात्मतेचे दर्शन घडविले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे रामकृष्ण कुंभार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शहरासह ग्रामीण भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: For the second year in a row, Eid prayers are offered at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.